ठाणे महापालिका मुख्यालयात विविध कामांनिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेने कचराळी भागातील नाल्यावर अत्याधुनिक दुमजली वाहनतळ उभारले आहे. शहरातील बहुचर्चित वाहनतळाचे काम नुकतेच पूर्ण झाले होते.
गेल्या काही महिन्यांपासून हे वाहनतळ शुभारंभाच्या प्रतिक्षेत होते. रविवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाने या वाहनतळाचे उद्घाटन करीत ते वाहनांसाठी खुले करून दिले. यामुळे महापालिका मुख्यालय तसेच पाचपाखाडी भागातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होणार असल्याने वाहतूक कोंडी टळणार आहे. ठाणे शहरात नाल्यावर वाहनतळ उभारण्याचा हा पहिलाच प्रयोग असून कचराळी भागात त्यास किती प्रतिसाद मिळतो यावर शहरातील इतर भागातील प्रकल्पांचे भवितव्य ठरणार आहे.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांत पुरेशा प्रमाणात वाहनतळे नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी करण्यात येतात. या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
शहरातील बहुतेक रस्ते अरुंद असल्याने त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही, तसेच वाहनतळांसाठी पुरेशी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील नाल्यांवर वाहनतळ उभारण्याची संकल्पना तत्कालीन नगर अभियंता के. डी. लाला यांनी मांडली होती आणि तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी वाहनतळाचे हे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महापालिका मुख्यालयाजवळील कचराळी परिसरातील नाल्यावर स्लॅब टाकून ३० चारचाकी वाहन क्षमतेचे दुमजली वाहनतळ उभारण्यात आले.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी या वाहनतळाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ठाण्याचे महापौर संजय मोरे, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, उपायुक्त संदीप माळवी तसेच पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

*  कचराळी तलावाजवळील नाल्यावर ५५ फूट बॉक्सटाइप आरसीसी बांधकाम करण्यात आले असून त्यावर हे दुमजली वाहनतळ उभारण्यात आले आहे.
* या वाहनतळामध्ये ३० चारचाकी वाहनांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
* पहिल्या सहा महिने हे वाहनतळ महापालिकेच्या ठेकेदारांमार्फत चालविण्यात येणार आहे.
* सुमारे एक कोटी रुपये खर्च करून महापालिकेने हा प्रकल्प उभा केला आहे.