फोर-जी तंत्रज्ञानासाठी भूमिगत वाहिन्या टाकण्याकरिता सवलतीच्या दरात दिलेली परवानगी रद्द करत रिलायन्स उद्योग समूहास तब्बल २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावून प्रकाशात आलेले ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त संजीव जयस्वाल २० एप्रिलपासून तब्बल ४२ दिवसांच्या रजेवर गेल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे. महापालिका आयुक्त म्हणून रुजू होऊन त्यांना जेमतेम काही महिनेच होत आले आहेत. प्रशासकीय मनमानीमुळे गेल्या वर्षभरापासून आर्थिक डबघाईला आलेला महापालिकेचा कारभार सुधारण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली होती.
त्यांच्या धडक मोहिमेने व्यापारी, दुकानदार, बिल्डर लॉबीला धक्का बसला होता. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित नेत्यांमध्येही असंतोष होता. ठाणे क्लबमधील मनमानी उघड झाल्यावर ठेकेदाराला असलेले राजकीय पाठबळ आणि लोकांमधील असंतोष या कात्रीतही ते सापडले होते. या पाश्र्वभूमीवर दीर्घ रजेवर गेल्याने, ते पुन्हा परततील का, या विषयीच चर्चा रंगत आहे.