महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना गुरुवारी पाच लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐरोली परिसरात अटक केली. महापालिकेत व्हेंटिलेटर पुरविण्यासंबंधीची निविदा मंजूर करून देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतल्याची बाब तपासात पुढे आली आहे. या निमित्ताने करोना काळातील त्यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

नवी मुंबई भागातील एका कंपनीमार्फत ठाणे महापालिकेत ३० व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी निविदा मंजूर करून देतो, असे सांगत निविदेच्या एकूण रकमेपैकी दहा टक्के रक्कम देण्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी १५ लाखांची मागणी केली होती. याबाबत संबंधित ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये पाच लाख रुपये लाचेचा पहिला हप्ता देण्यासाठी डॉ. मुरुडकर यांनी ऐरोलीतील एका खासगी रुग्णालयात बोलविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवारी ऐरोली परिसरात सापळा रचला. त्यावेळेस संबंधित ठेकेदाराकडून पाच लाखांची लाच घेताना डॉ. मुरुडकर यांना पथकाने अटक केली.