निपटारा करण्याबाबत उदासीनता

ठाणे शहरात स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग घ्यावा या हेतूने महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींचा पाऊस पडत आहे. मात्र नागरिकांच्या अ‍ॅपवरील तक्रारींची अजिबात दखल महापालिका प्रशासन घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.   काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या अ‍ॅपचे उद्घाटन केले.

[jwplayer zVOMyVTv]

मात्र या अ‍ॅपवर अनेक वेळा शहरातील अस्वच्छतेबाबत तक्रारी करूनही प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने या अ‍ॅपच्या कार्यप्रणालीविषयी नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी कचरा असल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणचे छायाचित्र काढून या अ‍ॅपवर अपलोड करायचे आहे. स्वच्छता अ‍ॅपवर काही नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. नागरिकांनी या अ‍ॅपवर नौपाडा, गोखले रोड, ठाणे रेल्वेस्थानकाजवळील सॅटिस पूल, समतानगर, तीनहात नाका, खोपट अशा विविध परिसरांतील अस्वच्छतेच्या अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र तक्रार करून बरेच दिवस उलटूनही संबंधित ठिकाणी स्वच्छता केली जात नाही, असे नागरिकांकडून सांगण्यात आले.

स्वच्छता अ‍ॅपवर आलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्याचे काम केले जाते. या परिसरात कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील असतो. नागरिकांची तक्रार असल्यास त्यांच्या तक्रारींचे निरसन केले जाईल.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका

[jwplayer y8Pn2zMM]