कोणतेही निर्बंध न घालण्याच्या स्पष्ट सूचना

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गृहसंकुलांनी खूपच निर्बंध घातले असून काही ठिकाणी मोलकरणींनाही कामावर येऊ दिले जात नाही. मात्र गृहसंकुलांनी आता अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध घालू नयेत तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांना ऑनलाइनद्वारे मार्गदर्शन करताना केल्या. तसेच निर्बंध घालून सभासदांच्या अडचणी वाढविण्यापेक्षा त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनतर्फे ‘सहकारी गृहनिर्माण संस्था आणि कोविड’ या विषयावर ऑनलाइनद्वारे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यासह ८० पदाधिकारी उपस्थित होते. करोना विषाणूचा संसर्ग आणखी किती दिवस असेल आणि तो केव्हा संपुष्टात येईल, याबाबत आता काहीच सांगता येत नाही. त्यामुळे लस येईपर्यंत नागरिकांना आता करोनासोबतच राहायचे आहे. स्वत:ची काळजी घेऊन नागरिकांना कामधंदा करायचा आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर गृहसंकुलांतील रहिवासी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडणार असून त्याचबरोबर गृहसंकुलांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आणखी वाढली असून पदाधिकाऱ्यांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

’ मुखपट्टय़ा वापरणे, सामाजिक अंतर राखणे, परिसरात थुंकण्यास मज्जाव करणे अशा प्रकारचे ठराव पदाधिकाऱ्यांनी करावेत.

’ गृहसंकुलांच्या आवारात सॅनिटायझर ठेवावे. सुरक्षा रक्षकांना ताप तपासणी यंत्र देऊन त्यांच्यामार्फत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची ताप तपासणी करावी.

’ करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, यासंबंधीचे फलक संकुलांच्या प्रवेशद्वारावर लावावेत.

’ शक्य असल्यास गृहसंकुलांमध्ये अलगीकरण कक्षाची उभारणी करावी आणि तिथे गरज भासल्यास महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर आणि प्रतिजन चाचण्याची व्यवस्था करण्यात येईल.

’  सभासदांकडून प्लंबर, सुतार, वायरमन तसेच भाजीवाल्यालांना घरी बोलविण्यात येते. मात्र, प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यक्तींना बोलवतात. त्याऐवजी संकुलातील पदाधिकाऱ्यांनी अशा व्यक्तींची निवड करून त्यांना संकुलात येण्यासाठी दिवस ठरवून द्यावेत.

’ आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असून त्यांची विचारपूस करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवक तयार करायला हवेत.