दिवाळीतील बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

खास प्रतिनिधी, ठाणे</strong>

दिवाळीच्या काळात महापालिकेची परवानगी न घेता शुभेच्छा फलक उभारून ठाण्याचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याबरोबरच न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सण, उत्सवांच्या काळात चौकाचौकांमध्ये शुभेच्छांचे फलक लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यंदाच्या दिवाळीत शहरातील फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र होते. त्यात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र होते. शहरातील वाहतूक दिशादर्शकांवरही फलक लावण्यात आले होते. या फलकबाजीमुळे शहर विद्रूप झाले होते. आगामी निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकार आणखी वाढीस लागतील अशी चिन्हे असताना इतके दिवस या प्रकारांकडे डोळेझाक करणाऱ्या आयुक्तांनी थेट न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. विनापरवाना फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.

अतिक्रमण निष्कासन फी वसुली धोरण

अतिक्रमण निष्कासन फी वसूल करण्याचे आदेशही आयुक्त जयस्वाल यांनी बैठकीत दिले आहेत. त्याचबरोबर ज्यांची घरे किंवा व्यावसायिक आस्थापना तोडल्या असतील तर त्यांची यादी तपासून त्यांच्याकडून किती निष्कासन फी वसूल करावी, याचे धोरण ठरविण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यासाठी समाज विकास विभागाकडून करण्यात आलेले बायोमेट्रिक्स तसेच स्थावर मालमत्ता विभागाकडून भाडेतत्त्वावरील योजनेतून घरे देण्यात आलेल्या नागरिकांची यादी तपासून खातरजमा करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.