शहर स्वच्छतेवरून पालिकेत रणकंदन
स्वच्छतेचा डंका पिटणारी महापालिका शहरातील रस्त्यांच्या साफसफाईसाठी कोटय़ावधी रुपये खर्च करत असतानाही जागोजागी अस्वच्छता असल्याचा आरोप बुधवारच्या सर्वसाधरण सभेत नगरसेवकांनी केला. तसेच याप्रकरणी नगरसेवकांनी संबंधित ठेकेदारांवर चौकशी करण्याची मागणी करताच महापौर संजय मोरे यांनी याप्रकरणी सात दिवसात चौकशी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिल्यामुळे संबंधित ठेकेदार अडचणीत आले आहेत.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्त्यांच्या साफसफाईची कामे ठेकेदरांना देण्यात आली असून त्यासाठी महापालिका कोटय़ावधी रुपये खर्च करते. ही कामे देताना ठेकेदारांना काही अटी घालण्यात आल्या होत्या, मात्र त्याचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. शहरातील रस्त्यांची रात्री ९ वाजेपर्यंत साफसफाई आणि वर्षांतून एकदा गटारांची साफसफाई करण्याची अट ठेकेदारांना देण्यात आली होती. परंतु, ठेकेदारांचे कर्मचारी रस्त्यांवर वरवरची साफसफाई करतात आणि सकाळी ११ नंतर हे कर्मचारी काम बंद करून निघून जातात. कर्मचाऱ्यांकडून नाल्यांची साफसफाई कधीच होताना दिसून येत नाही. शहरातील सर्वच भागात अशीच अवस्था आहे, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे यांनी सर्वसाधरण सभेत केला. याच मुद्दय़ावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी टिकेचा भडीमार केल्याने महापालिका प्रशासन अडचणीत आले. दरम्यान, याप्रकरणाची तात्काळ माहिती घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे यांनी स्पष्ट केले. मात्र, नगरसेवकांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करताच महापौर संजय मोरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.

‘शौचालये ताब्यात घ्या’
ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या साफसाफाईची कामे खासगी संस्थांना देण्यात आली होती, मात्र या संस्थांकडून शौचालयांची साफसफाई होत नाही. तसेच शौचालयांच्या वरच्या मजल्यावरील मोकळ्या जागेत अनेकांनी संसार थाटले आहेत. त्यामुळे ही शौचालये तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची महापालिकेमार्फत साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. यासंदर्भात यापुर्वीही अशाप्रकारचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे यावेळी समोर आले. याप्रकरणीही चौकशी करून सात दिवसात अहवाल देण्याचे आदेश महापौर मोरे यांनी दिले आहेत.