26 January 2021

News Flash

ठाणे स्थानक परिसरात विस्तीर्ण पदपथ

बेकायदा रिक्षा थांबे, अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी उपाय

बेकायदा रिक्षा थांबे, अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी उपाय

ठाणे : ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांना विनाअडथळा प्रवास करता यावा तसेच बेकायदा रिक्षा थांबे बंद व्हावेत, या उद्देशातून महापालिकेने नागरिकांसाठी पदपथाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सॅटिस पुलाखाली असलेली पोलीस चौकी ते अलोक हॉटेलपर्यंत पदपथ तयार करण्यात येणार असून या पदपथाच्या बाजूला छोटी झाडे लावण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सर्वाधिक वर्दळीचा परिसर म्हणून हा भाग ओळखला जातो. या भागातील सॅटिस पुलाखाली रिक्षा थांब्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. असे असले तरी या थांब्याबाहेर इतरत्र रिक्षा उभ्या केल्या जातात. या बेकायदा थांब्यामुळे प्रवाशांना स्थानक परिसरातून चालणे शक्य होत नाही. वाहतूक पोलिसांकडून या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येते. मात्र, तरीही कारवाईनंतर काही दिवसांनी रिक्षा पुन्हा इतरत्र उभ्या करण्याचे प्रकार सुरू होता. तसेच या भागात नागरिकांना चालण्यासाठी पदपथ नसल्यामुळे रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. त्यातच रस्त्यावर बेकायदा रिक्षा उभ्या केल्या जात असल्यामुळे प्रवाशांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांना येथून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने याठिकाणी नागरिकांसाठी पदपथाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदा रिक्षा थांब्यांच्या जागेवरच पदपथ तयार केला जाणार असून यामुळे स्थानकातील बेकायदा रिक्षा थांबे बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पदपथाच्या दोन्ही बाजूला छोटय़ा वृक्षांची लागवड केली जाणार असून या पदपथामुळे प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा होणार असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. सॅटिस पुलाखाली असलेली पोलीस चौकी ते अलोक हॉटेलपर्यंत १० फूट रुंदीचा आणि २५० मीटर लांबीचा पदपथ तयार करण्यात येणार असून त्याचे काम येत्या १५ दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी याठिकाणी लोखंडी गज बसविण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 4:29 am

Web Title: tmc decides to construct sidewalk for the citizens at thane railway station zws 70
Next Stories
1 कलाविष्काराने अंबरनाथकर रसिक मंत्रमुग्ध
2 महावितरणकडून अनेक प्रलंबित कामांना सुरुवात
3 नाल्याच्या पाण्यावरील शेती झाकण्याचा प्रयत्न
Just Now!
X