कर्तव्यादरम्यान कामचुकारपणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर मनगटी घडय़ाळ्याद्वारे पाळत ठेवण्यात येणार आहे. नेमून दिलेल्या ठिकाणी जीपीएस यंत्रणा असलेले घडय़ाळ मनगटावर बांधल्यानंतरच कर्मचाऱ्यांची हजेरी लागणार असून अर्धवट काम सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

ठाणे शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून शहरातून मोठय़ा प्रमाणावर घनकचरा संकलित होऊ लागला. असे असले तरी शहरातील साफसफाई यंत्रणेविषयी सातत्याने तक्रारी पुढे येत असतात. सफाईसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाच्या तक्रारी अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. काही कर्मचारी हे नियोजीत वेळेऐवजी मन मानेल तेव्हा कामावर येतात अशाही तक्रारी आहेत. यास आळा बसावा याकरिता महापालिकेने बायोमेट्रिक हजेरी तसेच तीन वेळा लेखी हजेरी घेण्यास घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरुवात केली. हजेरीची प्रकिया किचकट ठरत असल्याने पालिकेने यावर थेट जीपीएस घडय़ाळांचा उपाय शोधून काढला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस यंत्रणा असणारे घडय़ाळ देण्यात आले आहे. कामावर रुजू झाल्यावर हे घडय़ाळ मनगटावर बांधावे लागणार असून सदर सफाई कर्मचारी कामावर रुजू झाला की नाही, तसेच तो कोणत्या विभागात आणि किती वेळ काम करत आहे याची सर्व माहिती ठाणे महापालिकेला प्राप्त होणार आहे.

गेल्या महिनभरापासून शहरातील नौपाडा, रायलादेवी यासारख्या भागात हा प्रयोग राबवला जात असून शहरातील इतर प्रभाग समित्यांमध्येही जीपीएस मनगटी घडय़ाळ्यांचा प्रयोग राबवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिका घनकचरा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या या नव्या हजेरी उपक्रमामुळे कंत्राट कामावरील १३०० आणि महापालिकेच्या २५०० कामागारांच्या कामचुकवेगिरीला चांगलाच लगाम लागणार आहे, असा महापालिकेचा दावा आहे.

अशी यंत्रणा

जीपीएस आधारित घडय़ाळ बांधूनच सफाई कर्मचाऱ्याला कामावर रुजू व्हावे लागणार आहे. हे घडय़ाळ काम नेमून दिलेल्या ठिकाणाच्या संपर्कात येताच संबंधित सर्व माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सॉफ्टवेअरद्वारे प्राप्त होणार आहे. सदर जीपीएस घडय़ाळ बांधलेला कर्मचारी हा कोणत्या विभागात आहे आणि त्याने किती वेळ काम केले आहे या सर्वावरून कर्मचाऱ्याची हजेरी लागणार आहे. तसेच सफाई कर्मचारी त्याच्या कर्तव्याच्या वेळेस काम सोडून गेल्यास तीदेखील माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाला प्राप्त होणार आहे.

कामचुकारपणाआणि हजेरीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा उपक्रम सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येत आहे. या उपक्रमानंतर सफाई कर्मचाऱ्यांकडून सुयोग्य प्रतिसाद मिळत आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

– अशोक बुरपुल्ले, उपायुक्त- ठाणे महापालिका