उपवन ते माजिवडा जंक्शनचा रस्ताही रुंद होणार; प्रस्तावावर आज शिक्कामोर्तब
ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते उपवन मार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्यांच्या रुंदीकरणाची जोरदार तयारी सुरू करण्यात आल्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नव्या ठाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणाऱ्या पोखरण रस्ता क्रमांक-२ चे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला असून आज, शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, उपवन तलाव ते माजिवाडा जंक्शनपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच उपवन ते देवदयानगर या पट्टय़ाचेही रुंदीकरण केले जाणार आहे. या संपूर्ण पट्टय़ातील वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विकास आराखडय़ातील नियोजनाप्रमाणे शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही या कामांसाठी भरीव तरतूद केली आहे. महिनाभरापूर्वी आयुक्त जयस्वाल यांनी वर्तकनगर, समतानगर, लोकमान्यनगर, शिवाईनगर तसेच वसंत विहार भागात जाण्याकरिता असलेल्या पोखरण रस्ता क्रमांक -१ च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी रस्त्याच्या कडेला असलेली बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ आता वसंतविहार ते माजिवाडा जंक्शनपर्यंतच्या पोखरण रस्ता क्रमांक-२ च्या रुंदीकरणाचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे. वसंत विहार आणि घोडबंदर वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. तसेच हा रस्ता पोखरण रस्ता क्रमांक-१ ला जोडण्यात आलेला आहे. यामुळे वर्तकनगर भागातून वसंत विहार तसेच घोडबंदरकडे जाण्यासाठी अनेक जण या मार्गाचा वापर करतात. मात्र, या मार्ग वाहतुकीसाठी अपुरा पडू लागल्याने कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे जयस्वाल यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे.

रस्ता रुंदीकरणाचा नवा अध्याय
पोखरण रस्ता क्रमांक -२ या मार्गावरील उपवन तलाव ते माजिवडा जंक्शनपर्यंतच्या चार किमी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व बांधकाम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणारी बांधकामे हटविण्यात येणार आहे. त्यापैकी पात्र बांधकामधारकांची यादी करू. त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. रुंदीकरणानंतर त्या भागातील रस्त्यावर डांबरी करण करण्यात येणार आहे. तसेच पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटार तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पादचाऱ्यांसाठी पदपथही तयार करण्यात येणार आहेत. या मार्गावर मुंबई महापालिकेची जलवाहिनी असून त्यावरती वाहनांकरिता पूल आहे. या पुलाचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. संरक्षक भिंत, पथदिवे, लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी ८२.७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.