रस्त्यावर सशुल्क पार्किंग धोरण राबवण्याचा निर्णय; अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे

ठाणे : करोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने आता उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेले रस्त्यावरील स्मार्ट पार्किंग धोरण गुंडाळत त्याऐवजी परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सशुल्क पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव १९ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावामुळे शहरातील १६८ रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होण्याबरोबच महापालिकेला कोटय़वधी रुपयांचे उत्पन्नही मिळणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. तसेच अनेक ठिकाणी वाहनतळ उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यावर सशुल्क स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय पालिकेने आठ वर्षांपूर्वी घेतला होता. या प्रस्तावानुसार शहरातील १७७ रस्त्यांवर ९८५५ वाहने उभे करण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार होती. या योजनेसाठी महापालिकेला १८ कोटी रुपये खर्च येणार होता. त्यास सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली होती. या कामाकरिता १५ वर्षांच्या कालावधीसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यास प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ती रद्द करण्यात आली होती. आता नव्याने पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्यासाठी प्रभाग समिती स्तरावर पुन्हा सर्वेक्षण केले आहे. शहरात नव्याने उभे राहिलेले उड्डाणपूल, मेट्रो पूल या ठिकाणी मूळ योजनेत वाहनतळ होते. ते नव्या सर्वेक्षणानंतर रद्द करण्यात आले आहेत. तसेच नव्याने झालेले रस्ते आणि रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर वाहनतळ निर्माण करण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर स्थानिक शहर वाहतूक विभागाच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे पालिकेने पार्किंग धोरणाचा नवा प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये स्मार्ट पार्किंगऐवजी आता परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सशुल्क पार्किंग धोरण राबविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

जुन्या पार्किंग धोरण प्रस्तावानुसार ठाणे शहरातील एकूण १७७ रस्त्यावर सुमारे ९८५५ वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार होती. आता नव्या धोरणामध्ये १६८ रस्त्यांवर वाहनतळाची सुविधा निर्माण केली जाणार असून यामुळे रस्त्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी या सर्वच रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण केली जाणार असून या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये ६४७७ दुचाकी, १५४६ तीनचाकी, ३३६० हलकी चारचाकी, ५४८ अवजड चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

खासगी चारचाकी वाहनांसाठी

रस्त्याचे प्रकार   पहिले दोन तास  २ ते ४ तासांपुढे प्रति तास     ४ तासांपुढे प्रति तास

अ                            २५                        ५                                १०

ब                             २०                        ५                                १०

क                            १५                        ५                                 १०

ड                              १०                        ५                                १०

 

अहोरात्र पार्किंग शुल्क

रस्त्याचे प्रकार   रिक्षा प्रति तास        चारचाकी वाहन प्रति तास   चारचाकी अवजड वाहन

अ                            ५००                     १०००                                २०००

ब                             ५००                       ७५०                                १५००

क                            ५००                       ५००                                १०००

ड                              ५००                      ५००                               १०००

 

ठाणे शहरात नव्याने सर्वेक्षण करून रस्त्यावरील वाहनतळाची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावामुळे शहरातील १६८ रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याबरोबच या योजनेतून महापालिकेला उत्पन्नही मिळणार आहे.

रवींद्र खडताळे, नगरअभियंता, ठाणे महापालिका

वाहनांसाठी पार्किंग शुल्क

दुचाकींसाठी प्रति तास शुल्क (चारही प्रकारच्या रस्त्यांसाठी)

*  पहिले दोन तास- १० रुपये

*  २ ते ४ तासांपुढे प्रति तास- ५ रुपये

*  ४ तासांपुढे प्रति तास- ५ रुपये

रस्त्यांची वर्गवारी

* अ वर्ग रस्ते- मुख्य व महत्त्वाच्या रस्त्यांवर ज्या ठिकाणी वाहनांची दाट गर्दी होते.

* ब वर्ग रस्ते- मुख्य व महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते.

* क वर्ग रस्ते- रुग्णालये, शाळा, महाविद्यालयाजवळील रस्ते.

* ड वर्ग रस्ते- गृहसंकुलालगतचे वरील तीन वर्गवारी वगळता इतर रस्ते.