जलवाहिन्यांवर ऑनलाइन तपासणी यंत्रणा बसविण्याचा महापालिकेचा निर्णय

ठाणे : ठाणे, कळवा, मुंब्य्रातील झोपडय़ांमध्ये दूषित पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी वाढू लागल्याने या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जलवाहिन्यांवर ऑनलाईन तपासणी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेद्वारे पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण, प्रदूषके आणि पाण्याचा दाब याची सविस्तर माहिती पाणीपुरवठा विभागाला संगणकावर उपलब्ध होणार आहे. मोबाइल अ‍ॅपवरही पाण्याच्या गुणवत्तेची माहिती प्रशासनाला मिळणार असून त्याद्वारे दूषित पाणीपुरवठा तात्काळ रोखणे शक्य होणार आहे, असा दावा केला जात आहे.

ठाणे महापालिका विविध स्रोतांमार्फत दररोज ४८० दशलक्ष लिटर पाण्याचे शहरात वितरण करते. महापालिकेची स्वत:ची योजना, महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण, स्टेम कंपनी आणि मुंबई महापालिका या चार स्रोतांतून हा पाणीपुरवठा केला जातो. या चारही स्रोतांतून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, मात्र अनेक जलवाहिन्या नाल्यांतून तसेच जमिनीखालून टाकण्यात आल्यामुळे त्या फुटल्यानंतर त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होतो. अशा पाण्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते.

या पाण्याचा पुरवठा नेमका कुठून होतो, याची तपासणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे फुटलेल्या जलवाहिनीचा शोध घेताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आणि या जलवाहिनीतून मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने जलवाहिन्यांवर ऑनलाइन पाणी गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

१६ ठिकाणी यंत्रणा

ठाणे, कळवा, तसेच मुंब्रा या शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये गटार तसेच नाल्यांमधून जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिथे अशुद्ध पाणी पुरवठय़ाची शक्यता अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील १६ झोपडपट्टय़ांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या योजनेसाठी ४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासंबंधीचा सविस्तर अहवाल प्रशासनाने तयार केला असून तो येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी

ठाणे शहरातील जलवाहिन्यांमधून शुद्घ पाण्याचा पुरवठा होतो की नाही, याची चाचपणी करण्यासाठी चार ठिकाणी ऑनलाइन पाणी गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसवण्यात आली होती. समतानगर, लोकमान्यनगर आणि खेवरा सर्कल या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसवून त्याची चाचपणी करण्यात आली. त्यामध्ये पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण, दूषित पाण्याचा पुरवठा तसेच पाण्याचा दाब याची नोंद ठेवणे शक्य होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.