एक हजारांहून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त; राजकीय विरोध, स्थानिक पडसादाविना शांततेत कारवाई
एरवी किरकोळ कारवाईसाठी जातानाही धास्तीने जाणारे पालिका अधिकारी बुधवारी अत्यंत आत्मविश्वासाने मुंब्य्रात शिरले. खुद्द महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यासह पालिका अधिकारी, पोलीस, निमलष्करी जवानांच्या तुकडय़ा, साडेतीनशेहून अधिक कामगार असा भलामोठा फौजफाटा घेऊन दाखल झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दिवसभरात मुंब्य्रातील एक हजाराहून अधिक बांधकामे जमीनदोस्त केली. मुंब्य्रातील अतिक्रमणांवर कारवाई करायची म्हटलं की राजकीय दबाव, स्थानिकांचा आक्रमकपणा यांना तोंड द्यावे लागते, असा आजवरचा अनुभव होता. परंतु, बुधवारी यातले काहीच घडले नाही. उलट अनेक ठिकाणी व्यापारी मंडळी कारवाईचा मार्ग मोकळा करून देत होते. स्थानिकांच्या अशा सहकार्यामुळे मुंब्रा रेल्वे स्थानकापासून शहराच्या टोकावर असलेल्या ‘वाय जंक्शन’पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमणे हटवण्यात आली आणि मुंब्य्राला मुक्ती मिळाली!
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी मुंब्य्रातील मुख्य रस्त्यावर फेरफटका मारला तेव्हाच बुधवारच्या कारवाईचे स्वरूप मोठे असेल याचा अनेकांना अंदाज आला. बुधवारी या दोघा अधिकाऱ्यांच्या दिमतीला असलेला सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले होते. पदपथ, रस्ते अडवून बसणारे फेरीवाले, नाल्यांवरील बांधकामे, रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणारी अतिक्रमणे मुंब्य्रात अगदी नाक्यानाक्यांवर नजरेस पडतात. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा जीव ही अतिक्रमणे अक्षरश गुदमरवून टाकत असतात. एखाद दुसरा अपवादवगळता इतक्या वर्षांत या अतिक्रमणांना हात घालण्याची हिंमत फारशी दाखवली गेली नव्हती. मात्र, तगडय़ा पोलीस बंदोबस्तासह मुंब्य्रात शिरलेले महापालिकेच्या पथकाला पाहून या भागातील व्यापाऱ्यांनी स्वत:च वाढीव बांधकामे हटवली. अनेक नागरिकांनी जयस्वाल आणि परमबीर सिंग यांना भेटून या कारवाईबद्दल अभिनंदनही केले.
ठाणे शहरापाठोपाठ मुंब्य्रातील स्थानक ते कौसापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाची मोहीम महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हाती घेतली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीच्या जंजाळात अडकला आहे. ही कोंडी भेदण्यासाठी बुधवारी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईसाठी साडेतीनशेहून अधिक पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. याशिवाय, शीघ्रकृती दल आणि राज्य राखीव दलाच्या तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या होत्या. ठाणे महापालिकेतील तीन उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक आयुक्तांची सात स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. सकाळी ११पासून या पथकांनी कारवाईला सुरुवात केली. पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल पायी फिरून या कारवाईवर लक्ष ठेवून होते.