शिक्षण हा अतिशय मूलभूत हक्क मानला जातो. मात्र दुर्दैवाने तुलनेने आधुनिक आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरातही या आघाडीवर सध्या काहीशी अनास्था आहे. येथील शैक्षणिक व्यवस्थेत अनेक उणिवा आहेत. भौगोलिक विस्ताराच्या तुलनेत ठाण्यातील शैक्षणिक सुविधा अतिशय अपुऱ्या आहेत आणि त्यांचा दर्जाही भविष्यातील पिढीविषयी काळजी वाटावी असा आहे. ग्रामीण भागांप्रमाणेच शहरी विभागातही शिक्षणाच्या आघाडीवर अनास्था आहे. ठाणे शहरातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमधील मुले-मुली महापालिका शाळांमधून शिकतात. तिथे माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलांना अक्षरओळखही नसणे ही बाब धक्कादायक आहे. शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा या दुर्गम आदिवासी वस्तीत संदीप गुंड नामक एक ध्येयवादी शिक्षक डिजिटल शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवू शकतो, तर ठाण्यात का होत नाही?

ठाणे ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र शहराच्या या लौकिकास साजेशा शैक्षणिक व्यवस्था शहरात नाही. ठाणे शहरात सुसज्ज वसतिगृहाची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासनाने शहरात वसतिगृह उभारल्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होऊ शकेल. ठाण्यात शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. मात्र काळानुरूप तेथील अभ्यासक्रमांची फेररचना करणे आवश्यक आहे. अनेक सामाजिक संस्था शनिवार-रविवारी अथवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा भरवितात. अशा प्रकारचे उपक्रम हे विनामूल्य अथवा अल्प शुल्क घेऊन राबविले जातात. महापालिका प्रशासनाने त्यासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्यास असे उपक्रम राबविणे संस्थांना शक्य होईल.

दहावीपर्यंत सर्व शिक्षा अभियान असले तरी पुढील उच्च शिक्षणासाठी पैसा अनिवार्य आहे. शहरातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दहावीत उत्तम गुण मिळवितात. मात्र पुढे पैसे नसल्याने उच्च शिक्षणाचा नाद सोडून ते पोटार्थी होतात. गुणवत्ता आणि इच्छा असूनही उच्च शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहते. विद्यादान साहाय्यक मंडळ गेली दहा वर्षे अशा मुलांना शोधून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती स्वरूपात मदत करीत आहे. आमच्या संस्थेचे कार्यक्षेत्र मुख्यत: शहापूर तालुका आणि ठाणे शहर आहे. पालिका शाळांमधील गुणवत्ता हेरून त्यांना योग्य वेळी मदत केली, मार्गदर्शन आणि संस्कार केले तर अनेक कुटुंबे दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रातून बाहेर येतील. सुदैवाने ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात स्वयंसेवी पद्धतीने काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्था आहेत. महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन  समन्वय साधला तर त्यातून खूप चांगले काम उभे राहू शकेल. नव्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही या कामी हातभार लावतील. त्यांच्या मदतीने अशा गुणी विद्यार्थ्यांची प्रभागनिहाय यादी बनवून त्यांच्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केंद्र सुरू करता येतील.

गीता शहा, विद्यादान साहाय्यक मंडळ, ठाणे