ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा पोखरणमध्ये फज्जा

ठाणे महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत नागरिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पोखरण रस्त्यावरील सायकल माíगकेवर खासगी वाहने आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण सुरू केले आहे.

येथे स्वतंत्र सायकल मार्गिका तयार करण्यात आली असली तरी काही दिवसांपासून या मार्गिकेवर शाळेच्या बस उभ्या केल्या जात आहेत. कॅडबरी जंक्शन येथील रस्त्यावरही हळूहळू फेरीवाल्यांनीही बस्तान मांडायला सुरुवात केली असून हेल्मेट विक्रेते, फळ विक्रेत्यांनी वाट अडवली आहे. शास्त्रीनगर येथील अनधिकृत बांधकामे पाडून रुंदीकरण केलेल्या रस्त्यावरही आठवडा बाजार भरत असल्याने महापालिकेच्या फेरीवाला हटाव मोहिमेचा फज्जा उडाला आहे.

पोखरण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटावी या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेत कॅडबरी जंक्शन ते वर्तकनगपर्यंतचा रस्ता प्रशस्त करण्यात आला. रस्त्यावर स्वतंत्र सायकल मार्गिकाही करण्यात आली. मात्र या मार्गिकेवर गेल्या अनेक दिवसांपासून शाळांच्या बसगाडय़ा, खासगी वाहने उभी केली जात आहेत. हा रस्ता ठाणे- मुंबई महामार्गालगतच येत असल्याने या मार्गिकेवर हेल्मेट विक्रेते, फळ विक्रेत्यांनीही ठाण मांडले आहे. महापालिका प्रशासनाकडून या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या रस्त्याला जोडणाऱ्या शास्त्रीनगर परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत आड येणारी अनेक अनधिकृत बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली होती. वाहतुकीसाठी हा रस्ता प्रशस्त करण्यात आला. मात्र रुंदीकरण झाल्यानंतर काही महिन्यांतच या रस्त्यावरही फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर रविवारी या ठिकाणी आठवडा बाजार भरत असून प्रशासनाने याकडेही दुर्लक्ष केले आहे.

पोखरण रस्त्यावरील सायकल मार्गिकेवर वाहतूक अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.

– अशोक बुरपुल्ले अतिक्रमण विभाग ठाणे पालिका