५० टक्के सूट देण्याचा निर्णय कायम; सुट्टीच्या दिवशीही कर वसुली कार्यालये सुरू
ठाणे महापालिकेचे पाणी बिल आणि मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांच्या बिलातील विलंब आणि प्रशासकीय आकारात ५० टक्के सूट देण्याचा वादग्रस्त निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कायम ठेवला आहे. महापालिकेची कर वसुली अधिक वेगाने व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला जात असून येत्या ३१ मार्चपर्यंत ही अभय योजना कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कराचा भरणा करणाऱ्या थकबाकीदारांना विलंब आणि प्रशासकीय आकारात सूट नसेल अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान, पुढील तीन दिवस महापालिका कार्यालयास सुट्टी असली तरी या दिवशीही कर वसुली सुरूठेवली जाईल, अशी माहिती महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी पत्रकारांना दिली. शनिवार तसेच रविवारीही कराचा भरणा करता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने जकातीपाठोपाठ स्थानिक संस्था कराची वसुली थांबविण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच महापालिकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून ठाण्यासारख्या महापालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार करतानाही नाकीनऊ आले होते. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कर वसुलीच्या आघाडीवर आक्रमक धोरणे राबविल्याने यंदाच्या वर्षांत महापालिकेने सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी ठेवींच्या स्वरूपात ठेवला आहे.
स्थानिक संस्था कर, मालमत्ता कर तसेच पाणी बिलाच्या रकमा थकविणाऱ्यांविरोधात मागील वर्षभर जोरदार मोहीम राबविण्यात आल्या आहेत. या मोहिमांचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, कर वसुली वाढावी यासाठी थकबाकीदारांच्या विलंब शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय येत्या ३१ ऑक्टोबपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. मालमत्ता तसेच पाणी बिलाच्या वसुलीपोटी ठाणे महापालिकेस कोटय़वधी रुपयांचे येणे आहे. कराच्या मूळ आकारापेक्षा दंड आणि त्यावरील प्रशासकीय आकाराच्या रकमा बऱ्याच मोठय़ा असल्याने थकबाकीदारांकडून पुरेशा प्रमाणात वसुली होत नसल्याचा मुद्दा पुढे आला होता.
महापौर संजय मोरे यांनी विलंब शुल्क तसेच प्रशासकीय आकारात सवलत द्यावी, अशी सूचना मांडली होती. नियमितपणे कराचा भरणा करणाऱ्या ठाणे शहरातील शेकडो रहिवाशांवर हा एकप्रकारे अन्याय असल्याचा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झाला होता. त्यामुळे थकबाकीदाराना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत थकबाकीदारांसाठी ही अभय योजना कायम रहाणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पुढील तीन दिवस कर वसुलीसाठी महापालिका कार्यालये सुरू ठेवण्यात येतील, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी पत्रकारांना दिली.

या वेळात सुरू राहणार..
शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.३० तर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजे पर्यंत.