राजकीय टगेगिरीमुळे बदनामीचे टोक गाठलेल्या ठाणे महापालिकेत शुक्रवारी काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी थेट भाडोत्री गुंडांना बोलावून आपल्याच पक्षाचे मुंब्र्याचे नगरसेवक राजन किणे यांना चोप दिल्याने खळबळ उडाली. महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना एकेरी हाक मारल्याच्या फुटकळ मुद्दय़ावरून उभय नेत्यांत आधी सुरू झालेला वाद शिवीगाळ, हाणामारीपर्यंत पोहोचला. या वादाचे उट्टे काढण्यासाठी चव्हाण यांचे ‘समर्थक’ थेट महापालिका मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी महापालिकेच्या असहाय्य सुरक्षा रक्षकांसमोरच किणे यांच्यावर लोखंडी सळ्या, काठय़ांनी हल्ला चढविला. हल्लेखोरांना रोखण्यासाठी सरसावलेले महापौर संजय मोरे यांनाही धक्काबुक्की झाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा पोलिसांनी नोंदविला नव्हता.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा सुरू असताना एकेरी हाक मारल्याच्या मुद्दय़ावरून चव्हाण आणि किणे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. या वेळी किणे यांच्या अंगरक्षकाने मारहाण केल्याचा आरोप करत चव्हाण मुख्यालयातून बाहेर पडले आणि काही वेळातच २० ते २५ तरुणांचे टोळके मुख्यालयात दाखल झाले. या वेळी सभागृहाबाहेर पडलेल्या किणे यांना या टोळक्याने गाठले आणि त्यांच्यावर हल्ला चढविला. या वेळी विक्रांत चव्हाण यांनीही आपणास मारहाण केल्याची तक्रार किणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. किणे यांच्यावर हल्ला करण्यास आलेल्या तरुणांकडे लोखंडी सळ्या, बांबू होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
महापालिका मुख्यालयात सर्वासमक्ष हा प्रकार घडत असल्याचे वृत्त समजताच महापौर संजय मोरे यांनी तातडीने सभास्थान सोडले आणि त्यांनी किणे यांच्या बचावासाठी धाव घेतली. या वेळी काही तरुणांनी त्यांनाही धक्काबुक्की केल्याचे सांगितले जाते. महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेची लक्तरेही या प्रकाराने चव्हाटय़ावर आली आहेत. यापूर्वी परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडीवरून तत्कालीन उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण करत त्यांच्या दालनाची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान, किणे यांना मारहाण करावयास आलेले गुंड आपण आणले नव्हते, असा खुलासा विक्रांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला, तर विक्रांत चव्हाण यांनीही या गुंडांबरोबर मला मारहाण केली, अशी तक्रार किणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. हा मला जीवे ठार मारण्याचा कट होता, असा आरोपही किणे यांनी केला आहे.

 गटनेतेपद गेल्याने ठिणगी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या गटनेतेपदावरून विक्रांत चव्हाण यांची नुकतीच हकालपट्टी केली आहे. या निवडीदरम्यान चव्हाण आणि किणे यांचे संबंध ताणले गेले होते. उभय नेत्यांतील शुक्रवारच्या खडाजंगीत त्या वादाचीही किनार असल्याने या खडाजंगीचे पर्यवसान धक्काबुक्की, शिवीगाळ करणे तसेच धमक्या देण्यात झाले.