ठाणे महापालिकेचे दुर्लक्ष कायम

दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे शहरातील बाजार सजले असले तरी शहरातील अनेक पदपथ व्यापाऱ्यांनी आणि फेरीवाल्यांनी गिळंकृत केले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असून काही ठिकाणी पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच वाट काढावी लागत आहे. शहरातील विविध भागात सध्या हेच चित्र असून महापालिका अतिक्रमण विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे पादचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

स्मार्ट शहराची घोषणा करणारी ठाणे महापालिका शहरातील हक्काचे पदपथ हे फेरीवालामुक्त करण्यात अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील जांभळी नाका, नौपाडा, स्थानक परिसर, शिवाईनगर, लोकमान्यनगर, किसननगर परिसरात दुकानदारांसह फेरीवाल्यांनी मोठय़ा प्रमाणात पदपथ अडवून त्यावर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यापूर्वी शहरातील फेरीवाले हटविण्यासाठी महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली होती. काही दिवसानंतर कारवाई शांत झाल्यावर फेरीवाल्यांनी शहरातील पदपथांवर पुन्हा बस्तान मांडण्यास सुरुवात केली. त्यातच अधिकची भर म्हणजे शहरात दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठ सजल्याने फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली असून शहरात पदपथांवर चालण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील जांभळी नाका परिसर महत्त्वाची बाजारपेठ आहे. याठिकाणी दुकानदार त्यांच्या वस्तू दुकानांसह पदपथांवरही विक्रीसाठी मांडतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालत जावे लागते. या भागातून ठाणे महापालिका परिवहनाच्या बसगाडय़ांचा राबता असल्याने आणि पादचाऱ्यांचीही वर्दळ असल्याने सायंकाळच्या वेळी या भागात मोठी वाहतूक कोंडीही होत आहे. गावदेवी व नौपाडा परिसरात मोठय़ा प्रमाणात दिवे आणि कंदील विक्रेत्यांनी पदपथ अडवल्याने पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. सातत्याने याविरोधात तक्रारी होत असतानाही महापालिकेचे अधिकारी पदपथ अडवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याने पादचारी पुरते हवालदिल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महापालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

ठाणे स्थानकाजवळील गावदेवी परिसरात मोठय़ा प्रमाणात फेरीवाले वाढले असून पदपथांवरून चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळच्या वेळीही या ठिकाणी अशीच गर्दी असल्याने येथून वाट काढणे जिकिरीचे ठरत आहे. – रमेश चव्हाण, पादचारी.