पाणी देयकांच्या थकीत रक्कमेच्या दंड आणि व्याजावर ५० टक्के सूट   

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी देयकाची रक्कम जास्तीत जास्त वसूल व्हावी यासाठी आता थकीत पाणी देयकांच्या रकमेवरील दंड आणि व्याजामध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार चालू रक्कमेसोबतच थकीत रक्कम भरली तर त्यावरील दंड आणि व्याजामध्ये नागरिकांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. यामुळे थकीत रक्कमेची वसुली होऊन महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

पाणी देयक भरण्यासाठी महापालिकेच्या प्रभागनिहाय कार्यालयांतील गर्दी पाहता सुट्टीच्या दिवशीही करसंकलन केंद्र कार्यालय खुली ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने नुकताच घेतला आहे. त्यानंतर पाठोपाठ सवलतीचा हा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या पाणी देयकाची रक्कम थकविणाऱ्या थकबाकीदारांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. त्यामध्ये थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्यात येतात. मात्र थकीत रक्कमेवर आकारण्यात आलेल्या दंड आणि व्याजामध्ये सवलत दिली तर थकीत रक्कम भरणे शक्य होईल, अशी मागणी थकबाकीदारांकडून करण्यात येत होती. थकीत रक्कमेची वसुली होत नसल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर नरेश म्हस्के यांनी थकीत पाणी देयकांच्या रक्कमेवरील दंड आणि व्याजामध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार फेब्रुवारी महिनाअखेर पाणी देयकाच्या चालू रक्कमेसोबतच थकीत रक्कम भरली तर त्यावरील दंड आणि व्याजामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच १ ते ३१ मार्च या कालावधीत पाणी देयकाची पूर्ण रक्कम भरली तर पाणी देयक आकारावरील दंड आणि व्याजामध्ये ४० टक्के सवलत देण्यात येणार आहे. पाणी देयकाची संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू देयकाची रक्कम आणि सवलतीनंतर शिल्लक राहिलेली उर्वरित दंड आणि व्याजाची रक्कम एकत्रितपणे भरावी तरच या योजनेचा लाभ संबंधित थकबाकीदारांना घेता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच ज्या नागरिकांनी पाणी देयकाची संपूर्ण रक्कम दंडासह यापूर्वी भरली असेल त्यांना ही सवलत मिळणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सुट्टीच्या दिवशी कार्यालये खुली

नागरिकांना सुट्टीच्या दिवशी पाणी देयकाची रक्कम भरता यावी यासाठी महापालिकेची सर्व कर संकलन केंद्र सार्वजनिक सुट्टय़ा, चौथा शनिवार आणि सर्व रविवार या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या http://www.thanecity.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाइनद्वारे पाणी देयकाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या ऊ्रॠ्र ळँंल्ली या अ‍ॅपद्वारेही मालमत्ता कराची रक्कम भरल्यास त्यावर विशेष सवलत देण्यात येत आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.