ठाणे शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणी बिलाची रक्कम ३१ मार्चपूर्वी भरायची असून ही कर भरणा पद्धत सुरळीत व्हावी या उद्देशाने महापालिका प्रशासनाने सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये कर वसुलीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीसुद्धा नागरिकांना महापालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर आणि पाणीबिल भरणे शक्य होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने सकाळी घराबाहेर पडणारे शहरातील नागरिकांना घरी पोहचण्यासाठी रात्री उशीर होत असतो. त्यामुळे धावपळ करत महापालिकेचे कार्यालये गाठावी लागत होते. मात्र महापालिका कार्यालय बंद झाल्यास नागरिकांची फेरी वाया जात होती. तर सुट्टीच्या दिवशी महापालिका कार्यालय बंद असल्याने नागरिकांना कामाच्या दिवशी सुट्टी घेऊन कर भरावे लागत होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा मालमत्ता कर आणि पाणी बिलाची रक्कम वेळेत भरता यावी यासाठी महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालये दुसरा आणि चौथा शनिवार आणि इतर सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी सकाळी १० ते ५.४५ या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच रविवारी सर्व प्रभाग कार्यालयांतील कर आणि पाणीपट्टी वसुली विभाग सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणार आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी मात्र ही सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणी वसुलीसाठी कडक कारवाई..
पाणी विभागाची वसुली प्रभावीपणे व्हावी यासाठी पाणी पुरवठा विभागाने अतिशय कठोर पावले उचलावीत तसेच अनधिकृत नळजोडणी खंडित करावीत, अशा सूचना सोमवारी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता आणि मीटर वाचक यांची बैठक सोमवारी रणखांब यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीपुरवठा विभागाची वसुली चांगल्या प्रकारे व्हावी, त्यासाठी सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी आणि पाणी वसुली जास्तीत जास्त प्रमाणात होईल याची दक्षता घ्यावी, असे आदेश रणखांब यांनी दिले.