मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी सकाळी आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुलीत वाढ न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. बेकायदा नळजोडण्या तात्काळ तोडून टाकाव्यात अथवा दंडात्मक कारवाई करून नियमानुकूल करून घ्याव्यात. यापुढे पाणीपुरवठा विभागासाठी कोणतीही अभय योजना असणार नाही, हेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. महावितरण विभागाच्या यादीनुसार मालमत्ता कराची आकारणी करण्याचे आदेश मालमत्ता कर विभागाला दिले. तसेच मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांची यादी अद्ययावत करून त्याप्रमाणे करवसुली करण्याच्या सूचना दिल्या.