कळवा उड्डाणपुलाचा सावळागोंधळ सुरूच
ठाणे-कळवा आणि ठाणे-नवी मुंबई हा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने कळवा खाडीवर आखलेल्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम नेमके कधी सुरू होणार याविषयी महापालिका वर्तुळात कमालीचा संभ्रम असतानाच या कामाचे ठेकेदार मेसर्स जे. कुमार कंपनीला सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम अदा करण्याची तयारी अभियांत्रिकी विभागाने अंतिम टप्प्यात आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली वन विभागाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. असे असताना ठेकेदारासोबत करण्यात आलेल्या करारनाम्यात प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या काही तुरळक कामासाठी अग्रिम रक्कम देण्याची तरतूद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने उघडकीस आला आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभेत कळवा उड्डाणपुलाचे सुमारे १८० कोटी रुपयांचे काम घाईघाईत मंजूर करण्यात आले. हा उड्डाणपूल ज्या कळवा खाडीत उभारला जाणार आहे त्या ठिकाणी खारफुटीची विस्तीर्ण अशी जंगले आहेत. त्यामुळे पुलाची उभारणी करत असताना खारफुटीची कत्तल करावी लागणार आहे. हे करण्यापूर्वी पर्यावरण तसेच वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारची कोणतीही परवानगी नसताना महापालिकेने निविदा काढल्या आणि मेसर्स जे. कुमार आणि कंपनीला काम देण्याचा प्रस्तावही स्थायी समितीत मंजूर केला. आचारसंहिता लागण्यापूर्वी आयत्या वेळचा विषय सभागृहात मांडत या विषयाला कोणत्याही चर्चेविना हिरवा कंदील दाखविण्यात आला. सुमारे १८० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव मंजूर होत असताना सभागृहातील एकाही सदस्यांनी याविषयी साधा ब्र देखील उच्चारला नव्हता. दरम्यान, स्थायी समितीत या कामास मंजुरी मिळून तब्बल वर्ष उलटले तरी प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. राज्याच्या पर्यावरण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामंडळाने या उड्डाणपुलाच्या कामास यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

ठेकेदाराला पाच कोटी
ठेकेदाराने पर्यावरण तसेच वन विभागाच्या मंजुऱ्या तसेच साइट ऑफिसची उभारणी आणि तत्सम कामे पूर्ण केल्याने त्यास पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुभाष नाकाडी यांनी दिली. ठेकेदारासोबत केलेल्या करारनाम्यानुसारच ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. पर्यावरण विभागाच्या ठोस मंजुऱ्या मिळण्यापूर्वी अशाप्रकारे कामांना मंजुरी देणे आणि बिले अदा करणे योग्य आहे का, या प्रश्नावर मात्र त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले.