बाळकूम येथे खारफुटीवर भराव

ठाणे : पाणथळ जागा आणि कांदळवनांच्या संवर्धनाच्या एकीकडे मोठ्या गप्पा मारणाऱ्या ठाणे महापालिकेनेच स्मार्ट सिटीअंतर्गत आखल्या जाणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बाळकूम भागात कांदळवनावर मोठा भराव टाकला. या प्रकरणाची कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

ठाणे महापालिकेने तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहराच्या वेगवेगळ्या भागांत खाडीकिनारा संवर्धन प्रकल्पांची कोट्यवधी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. बाळकूम-साकेत मार्गावरील ठाणेकिनारी गेल्या वर्षभरापासून खाडीकिनारा विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. किनारपट्टी बांधकाम नियंत्रण नियमावली (सीआरझेड) नियमानुसार खाडीकिनारी ५० मीटर क्षेत्रात कोणतेही काम करता येत नसते. असे असताना महापालिकेच्या ठेकेदाराने खाडीकिनाऱ्यावर भराव टाकून काम सुरू केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे. या विस्तीर्ण कांदळवनावर गेल्या वर्षभरापासून पोकलेन आणि जेसीबी फिरवून कत्तल सुरू आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये येथील बाळकूम ग्रामस्थांनी या कांदळवनाच्या कत्तलीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली. नोव्हेंबर महिन्यात महापालिका, वनविभाग, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहाणी करून पंचनामा केला. तसेच हे काम थांबविण्यास सांगितले. त्यानुसार दोन ते तीन महिने या ठिकाणाचे काम बंद करण्यात आले होते. असे असताना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने दगड, मातीचा भराव टाकून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.

महापालिकेची बाजू ऐकून घेण्यासाठी एका वरिष्ठ अभियंत्याला माहिती विचारली असता आम्ही परवानगी आणि नियमानुसार काम करत असल्याचे सांगितले. आधी व्यवस्थित माहिती घ्या, मगच माझ्या नावासह प्रतिक्रिया टाका, असे सांगत या अभियंत्याने नाव टाकण्यास मनाई केली.

दरम्यान, पाणथळ संवर्धन समितीचे अध्यक्ष या नात्याने कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्तांना यासंबंधी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही या तक्रारींसंबंधी कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मिसाळ यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

वर्षभरापासून यासंबंधी पाठपुरावा सुरू आहे. असे असताना ठोस अशी कार्यवाही होत नाही. जिल्हा प्रशासनही या गंभीर प्रकाराकडे लक्ष देत नाही. अशा प्रकल्पांसाठी राजरोसपणे कांदळवने कापली जात असतील तर भयावह आहे. – गिरीश साळगावकर, रहिवासी

महापालिकेला या कामासाठी महाराष्ट्र सागरी किनारी व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ नियम आखून दिले आहेत. मात्र, या नियमांचे उल्लंघन महापालिकेकडून झालेले आहे. – रोहिदास पाटील, ग्रामस्थ