उद्यानांखाली वाहने उभी करण्याबाबत चाचपणी

ठाणे रेल्वे स्थानक परिसर आणि लगतच्या बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या कडेला वा कोणत्याही ठिकाणी बेकायदा वाहने उभी करण्यात येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता ठोस उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी स्थानक परिसराची पाहणी केल्यानंतर स्थानक परिसरातील गावदेवी मैदानाप्रमाणेच उद्यानांमध्येही भुयारी वाहनतळ सुरू करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे गावदेवी मैदानात सायंकाळी ६ ते १० या वेळेत तात्पुरत्या वाहन तळाची व्यवस्था करता येऊ शकते का, याचीही पाहणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

ठाणे ते दिवा रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूचा परिसर चकाचक करण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या आठवडय़ात घेतला होता. त्यासाठी त्यांनी ठाणे ते दिवा या स्थानकादरम्यान लोकलने प्रवास केला होता. त्यापाठापोठ सोमवारी सकाळी त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरासह कळवा-मुंब्रा भागांतील विविध प्रकल्पांचा पाहणी दौरा केला. पाच तासांच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध प्रकल्पांची, रस्त्यांची, पारसिक चौपाटी आणि स्थानक परिसराची पाहणी केली. ठाणे स्थानकातील दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यामध्ये ठाणे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आखलेल्या विविध उपाययोजनांबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेने यापूर्वी गावदेवी मैदानात भुयारी वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या भागात किमान ५०० दुचाकी वाहने उभी राहतील अशा पद्धतीने वाहनतळाची रचना केली जात आहे. लगतच असलेल्या उद्यानातही असेच भूमिगत वाहनतळ उभारल्याने पश्चिमेकडील भागात होणारी कोंडी कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे. यासाठी नगररचना तसेच अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले.

चौपाटी जूनअखेपर्यंत पूर्ण

ठाणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या पारसिक चौपाटीचे काम सुरू असून या कामाची पाहाणी आयुक्त जयस्वाल यांनी सोमवारी केली. या पाहणी दौऱ्यामध्ये चौपाटीला जोडून तयार करण्यात येत असलेल्या सेवा रस्त्याच्या कामाची पाहाणी करत येत्या जूनअखेपर्यंत ठाणेकरांचे चौपाटीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंता आणि संबंधित ठेकेदारांना या वेळी दिल्या.

विविध कामांची पाहणी

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सकाळी १० वाजता घोडबंदर रस्त्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यामध्ये पोखरण रस्ता क्रमांक ३, टिकूजिनी वाडी, ग्लॅडी अल्वारीस मार्ग, गांधीनगर चौक, पोखरण रस्ता क्रमांक २ या रस्त्यांची पाहणी करून ही कामे डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी नगर अभियंता अनिल पाटील यांना दिले. त्यांनी गांधीनगर ते शिवाईनगर चौकपर्यंत सुरू असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाची पाहणी करून ते लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच व्होल्टास कंपनी येथील नाल्यावरील पुलाची रुंदी वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. पोखरण रस्ता क्रमांक २ पासून घाणेकर नाटय़गृहपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून या रस्त्यामध्ये येणारे प्रार्थनास्थळ स्थलातंरित करण्याच्या सूचना दिल्या.