मुंबईपाठोपाठ मोठे व्यावसायिक केंद्र होत असलेल्या ठाणे शहरात स्वत:चे दुकान वा कार्यालय सुरू करणे लवकरच महाग होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी उद्योग परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात चौपट वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने ठाणे शहरात एक ते तीन हजार चौरस फुटांच्या जागेत कार्यालय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेच्या शुल्कापोटी २० ते ४० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
पाणी, मालमत्ता कर तसेच हॉटेल व्यावसायिकांना आकारण्यात येणाऱ्या कचराकरात वाढ करण्याचा पालिका आयुक्तांचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी स्थगित ठेवला असतानाच प्रशासनाने उद्योगधंदा थाटण्यासाठी आवश्यक असलेल्या परवान्याच्या दरांमध्ये वाढीचा प्रस्ताव पुढे आणला आहे.  शहरात कोणत्याही स्वरूपाचा उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून त्यासाठी आवश्यक तो परवाना घेणे बंधनकारक ठरते. असा परवाना घेतल्यानंतर स्थानिक संस्था कर तसेच एखाद्या मालाची आवक-जावक करण्याचा मार्ग सुकर होत असतो. यापूर्वी अशा परवाना शुल्काचे दर कमीत कमी २५० रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यत मर्यादित होते. मात्र, हे दर कमी असल्याचे सांगत ते आता किमान एक हजारांपासून ४० हजारांवर नेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
शहरात तात्पुरता, मोसमी तसेच सणांच्या कालावधीत प्रदर्शन अथवा ग्राहकपेठ भरविणाऱ्या हंगामी उद्योगांच्या परवान्यातही वाढीचा प्रस्ताव आहे. उद्योगधंदा किंवा साठा परवाना घेऊन इतर जागेत स्थलांतर करण्याचे प्रकारही होतात. त्यामुळे जागा बदलल्यास नवा परवाना घ्यावा लागेल, अशी अट टाकण्यात आली आहे.  
पुन्हा जयस्वाल-सत्ताधारी संघर्ष?
ठाणे महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पाणी, मालमत्ता यांसह विविध करांत वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयांचा फटका निवडणुकीत बसेल, या विचाराने सत्ताधारी शिवसेनेने दरवाढीचे प्रस्ताव रोखून धरले होते. या मुद्दय़ावर जयस्वाल आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात संघर्ष निर्माण झाला असतानाच आता उद्योग परवाना शुल्कातील वाढीच्या प्रस्तावामुळे त्यात भर पडण्याची चिन्हे आहेत.

जयेश सामंत, ठाणे</strong>