मेट्रोसाठी आवश्यक ठिकाणीच मार्गरोधक; सेवा रस्त्यांवर खोदकामास तूर्तास परवानगी नाही

ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सेवा रस्त्यांवरील खोदकामे थांबविण्याबरोबरच मल आणि जलवाहिन्यांचे काम झालेल्या भागांवर आठ दिवसांत डांबरी रस्ता तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी दिले. कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचे सेवा रस्ते अडविणारी गॅरेज बंद करण्याची कारवाई शुक्रवारपासून हाती घेण्याच्या आणि आवश्यक तिथेच मार्गरोधक लावून उर्वरित मार्ग मोकळा ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

महापालिका अधिकारी, एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांच्या बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले. मेट्रोच्या कामासाठी मार्गरोधक लावल्यामुळे घोडबंदर रस्ता अरुंद झाला आहे. त्यात मल आणि जलवाहिन्यांच्या कामांसाठी सेवा रस्ते खोदले आहेत. त्यामुळे कोंडी होऊन पाच मिनिटांच्या अंतरासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागत आहे. या संदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दुपारी संयुक्त बैठक घेतली.

मेट्रो मार्गासाठी खांब उभारणी किंवा अन्य कामांसाठी आवश्यक असेल त्याच ठिकाणी मार्ग रोधक लावावेत. उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जयस्वाल यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या. महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत ज्या ठिकाणी मल आणि जलवाहिन्या टाकण्याची कामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी माती टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. सेवा रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी व्हावे आणि हे रस्ते वाहतुकीसाठी खुले व्हावेत यासाठी काम झालेल्या भागांत आठ दिवसांत डांबरी रस्ता तयार करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अन्य कामेही लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी डांबरीकरणाच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सेवा रस्त्यांवर खोदकाम करण्यास तूर्तास परवानगी देणार नसल्याचे सांगत यापुढे सेवा रस्त्यांवरील खोदकामे थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले.

उपाययोजना..

’ सेवा रस्त्यांवरील बेवारस वाहने कासारवडवलीच्या मोकळ्या भूखंडावर टाकणे

’ सेवा रस्ते अडविणारी गॅरेज बंद करणे. एकाच बाजूला दुचाकी आणि हलकी वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था करणे

’ आवश्यक त्या ठिकाणीच मार्ग रोधक लावणे

’ बस तसेच ट्रकची बेकायदा पार्किंग हटविणे

’ सेवा रस्त्यांवर कामे झालेल्या ठिकाणी डांबरीकरण करणे

’ बंद पडलेले वाहन हटविण्यास विलंब होऊ नये म्हणून आनंदनगर येथील भूखंडावरील अतिक्रमण दूर करून क्रेनसाठी जागा देणे