19 October 2019

News Flash

घोडबंदरच्या कोंडीमुक्तीचा मार्ग!

मेट्रोच्या कामे टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना या बैठकीत सह आयुक्त पाण्डेय यांनी केल्या.

मार्ग रोधकांमुळे घोडबंदर रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे.         (छायाचित्र : सचिन देशमाने)

टप्प्याटप्प्याने काम करण्याच्या ठेकेदारांना सूचना; अनावश्यक मार्गरोधक हटवण्याचे आदेश

खास प्रतिनिधी, ठाणे

मेट्रो प्रकल्प आणि सेवा रस्त्यांच्या एकाचवेळी सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी ठाणे पोलिसांनी गुरुवारी ठेकेदारांसाठी कठोर आचारसंहिता जाहीर केली. मेट्रोचे काम टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना देतानाच ज्या ठिकाणी काम सुरू असेल, तेवढय़ाच ठिकाणी मार्गरोधके (बॅरिकेड्स) उभी करण्याची तंबी ठेकेदारांना देण्यात आली आहे.

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एकाच वेळी मेट्रो प्रकल्प आणि सेवा रस्त्यांची खोदकामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या होत्या. त्यापाठोपाठ ठाण्याचे सह पोलिस आयुक्त मधूकर पाण्डेय यांनी महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, महानगर गॅस, रिलायन्स, टाटा आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी यांची गुरुवारी बैठक घेतली.

मेट्रोच्या कामे टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना या बैठकीत सह आयुक्त पाण्डेय यांनी केल्या. तसेच आधीच्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या टप्प्यातील कामाला परवानगी देऊ नये, अशा सूचनाही प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या भागात एकाच वेळी अनेक यंत्रणांची खोदकामे सुरू आहेत. मात्र, यापुढे वाहतूक शाखेकडून एकावेळी एकाच यंत्रणेला खोदाकामास परवानगी दिली जाईल, असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले. तसेच खोदकामांसाठी महापालिका नोडल अधिकारी नियुक्त करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.

 

कोंडीमुक्तीसाठी सूचना

’ मेट्रो प्रकल्पासाठी खोदकाम करताना वाहतूक नियमनासाठी वाहतूक सेवक, इलेक्ट्रीक बॅटन, रिफलेक्टीव्ह जॅकेट, मार्गरोधक, वाहतूक बदलांचे फलक अशी सामुग्री वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून द्यावी.

’ प्रकल्पाचे काम करताना स्थानिक रहिवाशी आणि वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची दक्षता द्यावी.

’ मेट्रोचे काम एका दिवशी जेवढय़ा अंतराचे केले जाईल तेवढय़ाच लांबीचे मार्गरोधक बसवावेत. काम सुरू करता येत नसेल तर अनावश्यक मार्गरोधक लावून वाहतूक कोंडी करू नये.

७५ मिनिटे नितीन कंपनी ते ओवळा या नऊ किमीच्या अंतरासाठी सध्या लागणारा वेळ.

कोंडीची ठिकाणे : माजिवडा, आनंदनगर, पातलीपाडा, मानपाडा,  वाघबीळ, कासारवडवली

 

 

First Published on January 11, 2019 12:24 am

Web Title: tmc step to solve traffic deadlock on thane ghodbunder road