ठाणे शहरात सक्रिय असलेल्या सोनसाखळी चोरांच्या टोळ्यांकडून सायंकाळी किंवा रात्री अंधाराचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून ठाणे महापालिकेचा विद्युत विभागही आता पुढे सरसावला आहे. शहरातील कोणत्या भागात पथदिवे बंद आहे का, याची खातरजमा करण्यासाठी विद्युत विभाग दैनंदिन आढावा घेत असून बंद असणारे विद्युत खांब तातडीने सुरू करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देत आहे, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात सोनसाखळी चोरांच्या टोळ्या कार्यरत झाल्या असून या टोळ्यांकडून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरातील काही ठराविक भागात एकाच ठिकाणी सोनसाखळी चोरीचे प्रकार वारंवार घडत असून या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, सायंकाळी किंवा रात्री शहरातील पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचा  फायदा घेऊन चोरटय़ांकडून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचे प्रकार घडू शकतात, अशी भिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटते.