ठाणे स्थानक परिसर वाहतूक कोंडीमुक्त व्हावा तसेच येथील रस्त्यांचे रूंदीकरण करण्यासाटी महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून चालवलेली या परिसरातील अतिक्रमणांवरील कारवाई अद्याप सुरू आहे. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवारपासून महापालिकेच्या जुन्या इमारतीपासून ते जांभळी नाक्यापर्यंतची बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. एव्हाना कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट झाल्याने काही व्यापारी स्वत:हून आपापली बांधकामे हटवू लागले आहेत.

ठाणे स्थानक परिसरातील अशोक टॉकीज ते जांभळी नाकापर्यंतचा रस्ता शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. फेरीवाले आणि व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे या रस्त्यावरून वाहनांना जाणे शक्य होत नाही. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानक परिसरातील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात अशोक टॉकीज ते महापालिकेच्या जुन्या इमारतींपर्यंतच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये तळ अधिक दोन मजल्याच्या कोहिनूर इमारतीसह जवळपास ४५५ बाधित बांधकामे आणि इमारतींपुढील शेडची बांधकामे हटविण्यात आली आहेत.

पहिल्या टप्प्यातील ही कारवाई पूर्ण होताच महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवारपासून दुसऱ्या टप्प्यातील कारवाई सुरू केली आहे. दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या जुन्या इमारतीपासून ते जांभळी नाक्यापर्यंतची बांधकामे हटविण्यात येत आहेत. या कारवाईच्या तोंडावर काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकानासमोरील शेड काढण्यास सुरुवात केली होती. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी  या कारवाईसाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.