रस्ता अडवणारी दुकाने, गॅरेज, बांधकामांना नोटिसा; एक डिसेंबरपासून दंड आकारून कारवाई

ठाणे रेल्वे स्थानकालगत पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात कुचराई करणाऱ्या ठाणे महापालिकेने येत्या एक डिसेंबरपासून घोडबंदर तसेच पोखरण रस्त्यावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे बेकायदा गॅरेज, हॉटेल, बार तसेच कार विक्रीच्या दुकानांविरोधात जोरदार मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० नोव्हेंबरपर्यत संबंधितांनी स्वत:हून बांधकामे हटवावीत अन्यथा महापालिका कारवाई करून अतिरिक्त दंड आकारणी करेल, असा इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या वेळी दिला. दरम्यान, शहरात वाहतूक कोंडीचे कारण ठरत असलेल्या गॅरेजेस् तसेच जुन्या कार विक्री व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी घोडबंदर मार्गावर नऊ भूखंड राखीव ठेवण्याचा विचार केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

[jwplayer zVOMyVTv]

ठाणे महापालिकेने गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून शहरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, पोखरण रस्ता क्रमांक एक आणि दोन तसेच घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून मूळ शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही रुंदीकरणाचे बेत आखले जात आहेत. हे रुंदीकरण करत असताना महापालिकेने यापूर्वीच शेकडो बांधकामे पाडली आहेत. असे असताना रुंद झालेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा वाहनांचे अतिक्रमण होऊ लागले असून घोडबंदर सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूस बेकायदा पद्धतीने वाहने उभी राहात असल्याने हे रुंद रस्तेही कोंडीचे आगार ठरू लागले आहेत. घोडबंदर तसेच शहरातील सेवा रस्त्यांलगत मोठय़ा प्रमाणावर बेकायदा हॉटेल, बार तसेच गॅरेजेस् उभी आहेत. तसेच जुन्या कार विक्रीची दुकानांच्या वाहनांचे अतिक्रमणही या रस्त्यांलगत होत असते. यामुळे रुंदीकरणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींची दखल घेत महापालिकेने येत्या १ डिसेंबरपासून अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

घोडबंदर सेवा रस्ते, कॅडबरी जंक्शन ते शास्त्रीनगर तसेच पोखरण रस्ता क्रमांक दोन अशा प्रमुख मार्गावरील बेकायदा हॉटेल, गॅरेजेस् तसेच जुन्या कार विक्रीच्या दुकानांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. पुढील नऊ दिवसांत या मंडळींनी स्वत:हून वाढीव बांधकामे तोडावीत अथवा बांधकामे नियमित होत असतील तर त्यासाठी अर्ज करावेत अन्यथा १ डिसेंबरपासून ती पाडली जातील, असा इशारा आयुक्त जयस्वाल यांनी दिला. सेवा रस्त्यांना लागून असलेल्या जुन्या कार विक्रीच्या दुकानदारांनी तसेच मोठय़ा कार शोरुम्सच्या व्यवस्थापनांनी गाडय़ा रस्त्याच्या कडेला लावणे बंद करावे, अन्यथा त्यांना सील ठोकले जाईल, असा इशाराही जयस्वाल यांनी दिला.

भूखंड मोकळे करणार

हॉटेल आणि गॅरेजेसवर कारवाईचे हत्यार उगारत असताना महापालिकेने टीडीआर तसेच सुविधा भूखंडांच्या माध्यमातून महापालिकेस मिळालेल्या भूखंडांवर झालेल्या अतिक्रमणांविरोधातही येत्या १५ डिसेंबरपासून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या विकास आराखडय़ात विविध सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर झालेल्या अतिक्रमणांवरही कारवाई केली जाणार आहे, असेही जयस्वाल यांनी या वेळी स्पष्ट केले.

[jwplayer y8Pn2zMM]