ठाणे महापालिकेच्या नियमावलीला मुंबई महापालिकेच्या नियमांचा उतारा; रस्त्यांवर मंडपउभारणी

दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या काळात आयोजकांकडून सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या नियमावलीला राज्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेच्या नियमावलीचा आधार घेत केराची टोपली दाखवली आहे. सार्वजनिक उत्सवांसाठी मंडप उभारताना एकचतुर्थाश रस्ता मोकळा सोडावा लागेल, अशी प्रमुख अट पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी टाकली होती. मात्र, या आचारसंहितेचा अडसर होऊ लागल्याने ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुंबई महापालिकेची शिथिल आचारसंहिता स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात पुन्हा एकदा रस्ते अडवून मंडप उभारण्यात येण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांना परवानगी देताना नियमावली तयार करण्याचे आदेश सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने नियमावली आखत रस्त्यावर मंडप उभारताना त्याचा एकचतुर्थाश भाग मोकळा ठेवावा, अशी अट घातली होती. तसेच सहा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर मंडपांना परवानगी नाकारली होती. सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली वाहनचालक तसेच सर्वसामान्य पादचाऱ्यांना होणारा त्रास या नियमावलीमुळे संपण्याची चिन्हे होती. मात्र, या नियमावलीचा अडसर होऊ लागल्याने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत सर्व शहरांत उत्सवांची आचारसंहिता सारखीच असावी, असा मुद्दा मांडण्यात आला. हाच मुद्दा हाताशी धरून ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेने संजीव जयस्वाल यांनी आखलेली नियमावली फेटाळून लावत मुंबई महापालिकेची मवाळ नियमावली स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महापालिकेने आखलेल्या आचारसंहितेला न्यायालयाने हरकत घेतलेली नाही. मात्र, मुंबईपेक्षा ठाणे महापालिकेची नियमावली अधिक कडक होती. त्यामुळे कदाचित ती फेटाळली गेली असावी, असे मत संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले.

रस्ते अडविण्यास सुरुवात

मुंबई महापालिकेच्या नियमावलीत एकचतुर्थाश रस्त्याची अट समाविष्ट करण्यात आलेली नाही. वाहतुकीला पर्याय ठरू शकेल, असा दुसरा रस्ता उपलब्ध असेल तर मंडपांना परवानगी देण्यास हरकत नसावी, असे या नियमावलीत म्हटले आहे. त्यामुळे ठाण्यात रस्ते अडवून उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना एक प्रकारे अभय मिळाले आहे. नेमक्या याच मुद्दय़ाचा आधार घेत शिवसेनेने टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवाचा मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे.