18 November 2017

News Flash

पालिकेतर्फे पक्ष्यांनाही घरे, खाण्यापिण्याची व्यवस्था!

चिमणी दिनानिमित्ताने महापालिकेने हाती घेतलेल्या चिमणी वाचवा अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: March 21, 2017 3:21 AM

जागतिक चिमणी दिनानिमित्त कचराळी तलाव परिसरातील झाडांवर पक्ष्यांसाठी खाद्यभांडी ठेवण्यात आली.

धान्य, पाण्याचीही व्यवस्था पुरवणार!; अर्थसंकल्पात पाच लाखांची तरतूद; शहरातील झाडांवर घरटी बसवणार

ठाणे शहराच्या विकासासाठी विविध योजना राबवणाऱ्या महापालिकेने आता शहरातील पक्ष्यांच्याही उदरनिर्वाह आणि निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या काँक्रीटीकरणामुळे नाहीशा होत चाललेल्या ठाण्यातीलव पक्षिजीवनाला बळकटी देण्यासाठी शहरातील गृहसंकुले, तलाव, उद्याने आणि वनराई भागात घरटी उभारण्याचा संकल्प सोडतानाच, पालिकेने या घरटय़ांमध्ये खाद्यभांडी ठेवून पक्ष्यांसाठी धान्य-पाणी ठेवण्याचाही निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, या सर्वासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

जागतिक चिमणी दिनानिमित्ताने महापालिकेने हाती घेतलेल्या चिमणी वाचवा अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. या वेळी महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव परिसरातील झाडांवर पक्ष्यांसाठी खाद्यभांडी ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम संपूर्ण शहरात राबविला जावा यासाठी येत्या अर्थसंकल्पात ५ लाखांची तरतूद करण्याची घोषणा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या वेळी केली. ‘शहराच्या विकासाबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीने चिमणी व अन्य पक्षी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात या उपक्रमाकरिता पाच लाखांची तरतूद करण्यात येणार आहे. ठाणे सिटिजन फोरमच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयुक्त जयस्वाल यांनी दिली.

अर्थसंकल्पात खाद्याची भांडी खरेदी करण्यासाठी तरतूद करण्यात येणार असली तरी ज्या वेळी या भाडय़ांमधील खाद्य संपेल त्या वेळी नागरिकांनी स्वत:हून यामध्ये खाद्य टाकून या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.

पक्ष्यांप्रति प्रेम

चिमण्यांची संख्या कमी झाल्याने गेल्या काही वर्षांपासून विविध पर्यावरणवादी संस्थांच्या माध्यमातून चिमणी वाचवा अभियान राबवण्यात येत आहे. अशा प्रकारच्या अभियानातून नागरिकांमध्ये काही प्रमाणात जनजागृती होत आहे.

ठाणे सिटिजन फोरमच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून चिमणी वाचवा अभियान राबवले जात आहे. या अभियानात वर्तकनगर भागातील लक्ष्मी रेसिडेन्सी, नीलकंठ तसेच आसपासच्या मोठय़ा गृहसंकुलांमध्ये चिमणी व अन्य पक्ष्यांकरिता आतापर्यंत ४०० हून अधिक खाद्य भांडी बसवण्यात आली आहेत.

First Published on March 21, 2017 3:21 am

Web Title: tmc to make artificial nests on tree to save birds