महापालिका वर्षभरात सविस्तर अहवाल बनवणार; वसई-ठाणे-कल्याण मार्गाचे लवकरच भूमिपूजन

जयेश सामंत, ठाणे</strong>

मुंबई महानगर क्षेत्रात दळणवळणाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र सरकारने ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने सुरू केलेल्या प्रयत्नांना लवकरच मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून वसई-ठाणे-कल्याण या ५४ किलोमीटर अंतराच्या जलमार्गाचा भूमिपूजन सोहळा येत्या लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी हाती घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यातच आता ठाणे ते नवी मुंबईदरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम येत्या वर्षांत केले जाणार असून त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगर क्षेत्राला लाभलेल्या विस्तीर्ण अशा खाडीकिनाऱ्याचा वापर जलवाहतुकीसाठी केला जावा हा प्रस्ताव तसा जुना आहे. ठाणे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी यासाठी प्रयत्न सुरू केले. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अंतर्गत तसेच बाह्य़ जलवाहतूक प्रकल्पांची घोषणा अर्थसंकल्पात केल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाची सूत्रे असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाणे पालिकेच्या आराखडय़ास अनुकूलताही दर्शवली आहे. या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सुमारे ६६१ कोटी १४ लाख रुपयांच्या प्रकल्प अहवालास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना दिली. हे करत असताना ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर दुसऱ्या टप्प्यात जलवाहतूक सुरू व्हावी यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही पालिका करणार आहे. त्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. या प्रकल्पात वसई, मीरा-भाईदर, घोडबंदर, नागला, काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली आणि कल्याण येथे जेटी बांधणे, फेअरवे डेव्हलपमेंट अशी कामे केली जाणार आहेत.

नवी मुंबईचा भारही ठाण्यावर

सिडको तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यापूर्वी बेलापूर तसेच नेरुळ भागातून गेट वे ऑफ इंडियापर्यंत वेगवेगळ्या मार्गाची आखणी केली आहे. असे असले तरी ठाण्यापासून नवी मुंबईपर्यंतच्या जलमार्गाचा फारसा गांभिर्याने विचार झालेला नाही. ठाणे महापालिकेने यासाठी पुढाकार घेतान केंद्र सरकारने त्यास हिरवा कंदील दाखविला असून ठाणे नवी मुंबईदरम्यान वाशी, नेरुळ, बेलापूर, तळोजा, जुई गाव, पनवेल, जेएनपीटी आणि उरण लगतचे मोरा बंदरापर्यंतच्या आठ स्थानकांचा प्राथमिक प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. तसेच साकेत, कळवा, विटावा, मीठबंदर, ऐरोली, वाशी, ट्रॉम्बे, एलिफंटा, फेरीव्‍‌र्हाट, गेट वे ऑफ इंडियादरम्यान दहा स्थानकांचा आणखी एक मार्ग उभारता येईल का याचाही अभ्यास सुरू करण्यात आला आहे. यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आले असून त्यांचा खर्च महापालिका करणार आहे.