छेडा रेंटल हाऊसिंग योजनेतील घरांचे ‘बी-केबिन’च्या भाडेकरूंना अखेर वाटप
ठाण्यातील नौपाडा परिसरातील धोकादायक इमारतींमुळे बाधित झालेल्या रहिवाशांना त्यांच्या मूळ घरापासून जवळच असलेल्या परिसरात निवारा मिळणार आहे. रेंटल हाऊसिंग योजनेंतर्गत बांधण्यात आलेली एकूण १६५८ घरे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. त्यामुळे शेकडो बाधित रहिवाशांना मूळ घराजवळ पर्यायी निवारा उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होता. या प्रयत्नांना अखेर यश आले असून घंटाळीजवळ असलेल्या छेडा रेंटल हाऊसिंग योजनेत या रहिवाशांना स्थलांतरित केले जाणार आहे.
ठाण्यातील बी-केबिन परिसरातील कृष्ण निवास ही इमारत कोसळल्यानंतर अवघ्या दोन आठवडय़ांत ठाणे महानगरपालिकेने जवळपासच्या यशवंत कुंज, आजीकृपा, शांता सदन, आई, चंद्रकला, गणेश भुवन, सावित्रीदीप, अनुस्मृती, कमलाजी भवन, शकुंतला, श्रमधाम, पार्वती निवास, मनीषा या इमारतींमधील भाडेकरूंना केवळ २४ तासांची नोटीस देऊन इमारतीबाहेर काढले. या रहिवाशांना सद्य:स्थितीत ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्याचे पत्र महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आले होते. त्यातील काही भाडेकरू त्या पत्रासह ट्रान्झिस्ट कॅम्पच्या ठिकाणी गेले असता तेथेही राहण्यास जागा मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यामुळे भाडेकरू अक्षरश: रस्त्यावर आले होते. विखुरलेले भाडेकरू त्यामुळे भयभीत झाले होते. ही बहुतेक मंडळी वयस्कर असल्यामुळे बदलत्या वातावरणात त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी या आजारांचा त्रासही वाढत होता. यापैकी काहींनी वर्तक नगर येथील ‘दोस्ती रेंटल हाऊसिंग’मध्ये तर काहींनी साकेत येथील रेंटल हाऊसिंगमध्ये निवारा स्वीकारला.
ठाण्यातील नागरिकांचा हा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून व पत्र देऊन कळविला होता. ठाण्यातील छेडा एन्टरप्रायझेस, मॅजेस्टिक प्रीमायसेस, मेसर्स फ्रेंड्स डेव्हलपर्स या विकासकांनी बांधलेल्या इमारतींमध्ये अनुक्रमे ११५, १५३ व १३९० अशी एकूण १६५८ घरे महापालिकेच्या ताब्यात आली आहेत. नौपाडा भागातील धोकादायक इमारतींमुळे बाधित झालेल्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात राहण्यासाठी खूप लांब जावे लागत होते. मुलांची शाळा- महाविद्यालये आणि अन्य गोष्टींसाठी त्यांची गैरसोय होऊन त्यांना खूप त्रास सोसावा लागत होता. नौपाडा प्रभागातील वरील धोकादाक इमारतीमधून बाहेर काढलेल्या रहिवाशांसाठी घंटाळी येथील बाजी प्रभू देशपांडे मार्गावरील भारत सहकारी बँकेच्या मागील बाजूस असलेल्या छेडा आणि छेडा या रेंटल हाऊसिंग इमारतींमधील निवारा मिळवून देण्यात आला आहे.

रेंटलमध्येही महापालिकेचे वेगवेगळे घाट..
ठाण्यात अलीकडे झालेल्या क्रीडा महोत्सवातील पाहुण्या खेळाडूंना या जागेत महोत्सवाच्या दरम्यान निवारा देण्यात आला. नंतर नाटय़ संमेलनातील रंगकर्मीना या जागा देण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यामुळे रहिवाशांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. अखेर रहिवाशांनी आग्रही भूमिका घेऊन स्थलांतरितांची नावे असलेली यादी ठाणे महानगरपालिकेस सदर करून ताबडतोब निवाऱ्याचे वाटप करण्याची विनंती आयुक्तांना केली. या विनंतीस अनुसरून अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी तसे आदेश दिले. मागील आठवडय़ामध्ये विस्थापितांना निवारे वाटप करण्याची प्रक्रिया चालू झाली. प्रातिनिधिक स्वरूपात आ. केळकर यांच्या हस्ते काही वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या सदनिकांच्या चाव्या देण्यात आल्या. तसेच सुमारे सत्तर बेघर कुटुंबाना सदनिकांच्या कागदपत्रांची पूर्तता तसेच त्याचे बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणीकरण झाले आहे.