ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागातून दररोज निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतासारखे विविध प्रकल्प राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण करण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एरवी अशा वर्गीकरणास वसाहतींमधून फारसा प्रतिसाद मिळत नाही, असा अनुभव आहे. मात्र, ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या या प्रयत्नांना शहरातील तब्बल १०० गृहसंकुलांनी प्रतिसाद दिला असून अशा वर्गीकरणामुळे मोठय़ा प्रमाणावर खत निर्मितीस चालना मिळू शकेल, असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना केला.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतून दररोज सुमारे ६५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असते. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे स्वत:ची क्षेपणभूमी नाही. त्यामुळे महापालिकेने मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत तळोजा येथे उभारल्या जाणाऱ्या क्षेपणभूमीत शहरातील कचरा टाकण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. असे असले तरी महापालिका प्रशासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतासारखे विविध प्रकल्प राबविण्याचा विचार सुरू केला आहे. असे प्रकल्प राबविण्यासाठी सुका आणि ओला कचरा वेगळा गोळा करावा लागतो. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार घनकचरा निर्माण करणाऱ्या प्रत्येक घटकांना ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे पालकन करता यावे यासाठी घंटागाडीसारखा प्रयोग राबविण्यात आला. मात्र, त्याला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात एक मोहीम हाती घेत शहरातील मोठय़ा गृहसंकुलांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे न करणाऱ्या गृहसंकुलांचा कचराच उचलला जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले होते.
पालिकेच्या दणक्यामुळे आतापर्यंत सुमारे १०० गृहसंकुलांनी कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे. या संकुलांमधून दररोज ५० टन ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा होत आहे. वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात हा कचरा टाकण्यात येत असून या कचऱ्यावर प्रक्रिया राबवून विविध प्रकल्प राबविण्याचा विचार प्रशासन करित आहे.
दरम्यान, चाळी तसेच झोपडपट्टी वस्त्यांमध्ये ओला आणि सुका कचरा गोळा करणे अद्याप शक्य होत नाही. तिथे ओला आणि सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी स्वतंत्र डबे नसतात. त्यामुळे या भागात ओला आणि सुका कचरा गोळा करणे शक्य नाही. मात्र, तिथेही ही मोहीम कशा पद्धतीने राबविता येऊ शकते, याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.