करोनामुक्त झाल्यानंतर बाधितांना मार्गदर्शन; वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञासह सर्व सुविधा उपलब्ध

ठाणे : महापालिका क्षेत्रात करोनामुक्त रुग्णांसाठी अद्ययावत कोविडोत्तर केंद्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून हे केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कशी मात करायची आणि कोरोनामुक्त झाल्यानंतर काय काळजी घ्यायची, याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय करोनाच्या काळातील अनुभवांमुळे मानसिकदृष्टय़ा खचून गेलेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी याठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे येथील माजिवाडा भागातील लोढा लक्झोरिया कॉम्प्लेक्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महापालिकेने हे केंद्र उभारले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी करोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना जाणवणाऱ्या अनेक लक्षणांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, करोनामुक्त रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच करोनाच्या काळातील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, समुपदेशक, फिजिओथेअरपिस्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच योगा केंद्र, विश्रांती कक्ष आणि समुपदेशन कक्ष अशा सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

करोनानंतर जाणवणारा थकवा, बैचेनी, अनाहूत अस्वस्थता, लक्ष केंद्रीत न होणे, लवकर काही न आठवणे अशा अनेक कारणांनी रुग्ण त्रस्त झालेले असतात. त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळेच या केंद्रामध्ये मानसोपचार तज्ञाच्या सुयोग्य मार्गदर्शनाने रुग्णांना मानसिकदृष्टय़ा सक्षम केले जाणार आहे.

विशेष बसची सुविधा

या केंद्रामध्ये करोनामुक्त रुग्णांना ये-जा करण्यासाठी ठाणे स्थानकातून विशेष बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी  ६.३० वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत दर अर्धा तासांनी या केंद्राच्या ठिकाणी बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

छपाईत चूक

कोविडोत्तर केंद्राच्या माध्यमातून आरोग्य राखण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असून याबाबत केंद्रात लावलेल्या एका पोस्टवर काही सल्ले देण्यात आले होते. त्यामध्ये रोज योगासने, प्राणायम आणि ध्यानधारणा करा. रोज सकाळी आणि सायंकाळी चाला, सकस आहार घ्या. पुरेशी झोप आणि आराम करा, असे सल्ले देण्यात आले होते. त्याचबरोबर मद्यप्राशन आणि सिगारेट ओढा असाही सल्ला देण्यात आला होता. मात्र मद्यप्राशन आणि सिगारेट ओढणे टाळा, असा सल्ला देण्यात आल्याचे सांगत छापाईतील चुकीमुळे हा प्रकार घडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.