आकर्षक भित्तीचित्रे, स्वच्छता; पालिका आयुक्तांची लोकलमधून पाहणी

ठाण्यातील विविध रस्त्यालगत बकाल अवस्थेत असलेल्या भिंतींवर रंगरंगोटी करून महापालिका प्रशासनाने शहराच्या सौंदर्यीकरणात भर घातली असतानाच आता त्यापाठोपाठ ठाणे ते दिवा रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजू स्वच्छ करून तेथील भिंतींवर रंगरंगोटी करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी ठाणे ते दिवा असा रेल्वेने प्रवास करत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या उपक्रमाची घोषणा केली असून या उपक्रमामुळे रेल्वे मार्गाच्या परिसराचे बकालपण दूर होऊन तो रंगबेरंगी होणार आहे. तसेच भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

ठाणे  ते दिवा रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला कचऱ्यांचे ढीग, बकाल अवस्थेत असलेल्या भिंती आणि अस्वच्छ परिसर असे चित्र पाहायला मिळते. हे चित्र बदलण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘पेंट दि सिटी वॉल’ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान आकर्षक रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी मंगळवारी दुपारी ठाणे ते दिवा असा रेल्वेतून प्रवास करून परिसराचा पाहणी दौरा केला.

त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर या लोकलने प्रवास केला. त्या वेळेस महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक पूर्वेश सरनाईक, मुंबईच्या प्रसिद्ध लॅण्डस्केप डिझायनर रूबल नागी, प्रसिद्ध चित्रकार किशोर नादावडेकर, वास्तुविशारद प्रवीण जाधव उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला पडलेला कचरा साफ करणे, झोपडपट्टय़ांच्या बाजूला पडलेला कचरा उचलणे, तिथे रंगरंगोटी करणे तसेच ‘पेंट द सिटी वॉल’ या मोहिमेच्या धर्तीवर संरक्षक भिंतींवर रंगविणे, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अन्य स्थानकांवरही लवकरच..

इंडोनेशियामधील कँगपूंग पीलंग, पोलंडमध्ये झलिपी, स्पेनमध्ये जुझकार, ब्राझिलमध्ये रियो आणि मेक्सिकोमधील पचुका’स लास पल्मितास या गावांची संपूर्ण रंगरंगोटी करून त्या गावांना आकर्षक बनविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पेंट दि सिटी वॉल या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान आकर्षक रंगरंगोटी करण्यात येणार आहे. जेणेकरून ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे प्रवास करणाऱ्यांना प्रसन्न वाटेल. याच धर्तीवर रुपादेवी पाडय़ाचा विकास करणार असल्याचेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले. सर्वेक्षण, संकल्पचित्र आणि कृती आराखडा एका महिन्यात तयार करून काम सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.