सूरज परमार आत्महत्या प्रकरण; आज हंगामी जामिनावर सुनावणी
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चार नगरसेवकांची नावे असल्याचे समोर येताच ठाणे पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली आहे. या चौघांच्या घरी तसेच कार्यालयात पोलीस पथके गेली होती. मात्र, त्याआधीच चौघेही फरारी झाल्याने एकही नगरसेवक पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, अटकेच्या भीतीपोटी या चौघांनी दाखल केलेल्या हंगामी जामीन अर्जावर गुरुवारी ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. चौघांपैकी तिघांनी उच्च न्यायालयातही हंगामी जामिनासाठी धाव घेतली असून त्यावरही सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूरज परमार यांच्या या चिठ्ठीतील खोडलेल्या नावांत नगरसेवक विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांचा समावेश आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर ठाणे पोलिसांनी ही नावे उघड केली आहेत. या चौघांचा शोध सुरू असून पोलीस पथके त्यांच्या मागावर आहेत.
अनेकांची चौकशी
परमार आत्महत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी काही नगरसेवकांना नोटिसा पाठवून बुधवारी चौकशीसाठी बोलाविले होते, तर काहींना गुरुवारी बोलाविण्यात आले आहे. हे प्रकरण महापालिकेशी संबंधित आहे, त्यामुळे अनेकांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी स्पष्ट केले.