टीएमटीच्या अर्थसंकल्पात नव्या घोषणांचा अभाव; तिकीटवाढ नाही

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा(टीएमटी) २०१८-१९ या आर्थिक वर्षांचा ३८१ कोटी २६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासनाने गुरुवारी समितीच्या बैठकीत सादर केला असून त्यामध्ये जुन्याच घोषणांना नव्याने मुलामा दिल्याचे दिसून येत आहे. या अर्थसंकल्पामध्ये बसच्या तिकीट दरात कोणतीही भाडेवाढ सुचविण्यात आलेली नसल्यामुळे ठाणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, गेली अनेक वर्षे महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून असणाऱ्या परिवहन प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच जाहिरात हक्क तसेच विविध स्रोतामार्फत उत्पन्नाचे पर्याय सुचवून त्यातून वर्षांकाठी १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा दावा केला आहे. असे असले तरी या अर्थसंकल्पामध्ये ठाणे महापालिकेकडून तब्बल २२७ कोटी ७३ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली असून त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पामध्ये तब्बल १२४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील परिवहन सेवेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कै. मीनाताई ठाकरे सभागृहामध्ये गुरुवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी ३८१ कोटी २६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी सभापती अनिल भोर यांना सादर केला. त्यामध्ये महसुली उत्पन्न ३५२ कोटी ८१ लाख तर भांडवली खर्च २८ कोटी ४५ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी प्रशासनाने २२८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला होता. मात्र, त्यामध्ये तब्बल १२४ कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याने यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकडा ३८१ कोटी २६ लाख रुपयांपर्यंत पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ११८ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनुदानाच्या रकमेत १०८ कोटी रुपयांची वाढ करीत तब्बल २२७ कोटी रुपयांच्या वाढीव अनुदानाची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये महसुली खर्चासाठी ९६ लाख, भांडवली खर्चासाठी २८ कोटी ४५ लाख, दिव्यांग आणि इतर व्यक्तींच्या सवलतीपोटी ११ कोटी २२ लाख, जी.सी.सी. अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसच्या संचालन तुटीपोटी आणि कंत्राटी कामगार देण्यापोटी ९१ कोटी ७२ लाख रुपयांचा समावेश आहे.

उत्पन्न वाढीसाठी नवे पर्याय..

बसगाडय़ांमध्ये एलईडी टीव्ही बसवून त्यावर उत्पन्न मिळविणे, परिवहन सेवेच्या मालमत्तांवर होर्डिगसाठी परवानगी देऊन उत्पन्न मिळविणे, परिवहन सेवेच्या जागांमध्ये एटीएम सेंटर उभारणी करून त्याद्वारे उत्पन्न मिळविणे, असे उत्पन्न वाढीचे नवे पर्याय प्रशासनाने सुचविले आहेत.

गतवर्षीच्याच घोषणा

शंभर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाडय़ा, शंभर बायो-इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या बसगाडय़ा, महिलांसाठी तेजस्विनी बसगाडय़ा, ई-तिकीट सेवा, परिवहन सेवेचे संकेतस्थळ, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवासी भाडय़ात सवलत अशा जुन्याच घोषणा अर्थसंकल्पामध्ये नव्याने सादर करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांसाठी सुविधा

परिवहन सेवेच्या जुन्या बसगाडय़ांमध्ये केंद्र शासनाच्या निर्भया योजनेतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये पॅनिक बटण सुविधा निर्माण करणे, प्रवाशांचा टीएमटीकडे ओढा वाढला यासाठी एसटीच्या धर्तीवर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी बसमध्ये शुगर बॉक्स बसविणे, बसवरील जाहिरातींचे अधिकारी देऊन बस खरेदी करणे, अशा सुविधा प्रवाशांना देण्यात येणार आहेत.

सहाशे बसगाडय़ा ताफ्यात..

  • ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सीएनजीवर चालणाऱ्या १०३ तर डिझेलवर चालणाऱ्या १७४ अशा एकूण २७७ बसगाडय़ा आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात १६५ बसगाडय़ा दररोज प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर येतात. उर्वरित बसपैकी शंभर बसगाडय़ांची दुरुस्ती करून त्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.
  • जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत परिवहन सेवेच्या ताफ्यात ११० साध्या बस तर ८० मिडी बस अशा एकूण १९० बसगाडय़ा दाखल झाल्या आहेत. याशिवाय, शंभर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाडय़ा, बायो-इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या शंभर बसगाडय़ा, महिलांसाठी तेजस्विनी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यामुळे या वर्षांअखेर परिवहनच्या ताफ्यात सहाशे बसेस उपलब्ध होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.