News Flash

जुन्या-नव्या घोषणांची सरमिसळ

‘टीएमटी’चा अर्थसंकल्प सादर

(संग्रहित छायाचित्र)

‘टीएमटी’चा अर्थसंकल्प सादर

२८४ कोटी ६३ लाखांच्या अनुदानाची मागणी

तिकीट दरवाढ नाही

३५० नव्या बसगाडय़ा दाखल होण्याचा दावा

विजेवर चालणाऱ्या १०० तर ५० मिडी बस खरेदी करत ठाणेकरांना गर्दीविरहित तसेच आगामी वर्षांत तिकीट दरवाढमुक्त प्रवाशाची हमी देणारा ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा येत्या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प शुक्रवारी प्रशासनाकडून परिवहन समितीला सादर करण्यात आला. याशिवाय परिवहन सेवेच्या चौक्या तसेच बसगाडय़ांमध्ये एलईडी स्क्रीन लावून जाहिरातीद्वारे उत्पन्न मिळविण्याचा संकल्पही सोडण्यात आला आहे. परिवहनच्या जागांवर होर्डिग्जला परवानगी देणे आणि एमटीएम सेंटरची उभारणी करणे अशा जुन्या आणि नव्या घोषणांची सरमिसळ या अर्थसंकल्पात आहे.

गेल्या वर्षी महापालिकेकडून २९१ कोटीच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. यंदा २८४ कोटी ६३ लाखांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली असून त्याचबरोबर यंदाच्या वर्षांत ३५० नव्या बसगाडय़ा डिसेंबर २०२१ पर्यंत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ४५८ कोटी १३ लाख रुपये जमा-खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून परिवहनचे उत्पन्न वाढविणे, सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीजबचत करणे, आनंदनगर आणि कोलशेत आगारातील भूखंड बांधा, वापरा आणि हस्तांतरित तत्त्वावर विकसित करणे आणि त्याचबरोबर प्रवासी संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, अशा बाबींवर भर देण्यात आला आहे.

सध्या टीएमटीच्या ताफ्यात ३६४ बसगाडय़ा आहेत. त्यापैकी टीएमटीच्या १२४ बसगाडय़ांपैकी वातानुकूलित बसगाडय़ांसह सरासरी ११० बसगाडय़ा विविध मार्गावर चालविण्यात येतात. जेएनएनयूआरएम अंतर्गत प्राप्त झालेल्या १९० आणि महिलांसाठी असलेल्या ५० तेजस्वनी बस अशा २४० पैकी २२३ बसगाडय़ा जीसीसी तत्त्वावर चालविण्यात येतात. सध्या ७५० बसगाडय़ांची आवश्यकता असून शासनाच्या माध्यमातून २०० बसगाडय़ा, एमएमआरडीद्वारे खासगी लोकसहभागातून १०० विजेवरील बसगाडय़ा व ठाणे महापालिकेकडून ५० मिडी बसगाडय़ा खरेदी करण्याचे नियोजन आखले आहे. या बसगाडय़ा २०२१ डिसेंबर महिना अखेपर्यंत दाखल होणार असून या नवीन ३५० बसगाडय़ांमुळे प्रवासी सुविधेसाठी ७०० बसगाडय़ा उपलब्ध होणार आहेत. दरम्यान टाळेबंदीत टीएमटीला सुमारे ८० कोटीच्या उत्पन्नाला मुकावे लागणार असल्याची बाब अर्थसंकल्पातून समोर आली आहे.

प्रवासी संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना

*  प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवासी गर्दीच्या वेळेत पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

* स्मार्टसिटी योजनेअंतर्गत डिजिटल बस थांबे निर्माण करून त्यावर बस आगमनाची वेळ दर्शविण्यात येणार आहे. परिणामी, बसची वेळ कळण्यास मदत होणार असून त्याजोगे प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे.

* आरटीओ आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अवैधरीत्या सुरू असलेल्या वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न करणार आहे.

* अधिकाधिक मिडी व मिनी बसगाडय़ा घेऊन त्या ज्या मार्गावर बस सेवा उपलब्ध नाही, अशा मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

8 खासगी वाहनांऐवजी टीएमटीच्या बसचा वापर करण्यासाठी डिजिटल माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.

उत्पन्न वाढीबाबतचे स्रोत

* परिवहन सेवेच्या जागांवर होर्डिग्जला परवानगी देणे.

* परिवहन सेवेच्या चौक्यांना जाहिरातीचे अधिकार देऊन विकसित करणे.

* अत्याधुनिक निवारे विकसित करणे.

* परिवहन सेवेच्या जागांमध्ये एटीएम केंद्राची उभारणी करणे.

* बस आगारांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवणे.

* बसमध्ये एलईडी स्क्रीन लावून जाहिरातीद्वारे उत्पन्न वाढविणे.

* आनंदनगर व कोलशेत आगारातील राखीव भूखंड बांधा-वापरा-हस्तांतरित करणे.

* शहरातील रस्त्यावरील कामांमुळे बसफेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण जास्त असून ते कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत उपाययोजना करणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:11 am

Web Title: tmt budget presented abn 97
Next Stories
1 ठाण्यात पाणी देयकांमध्ये सावळागोंधळ
2 वसई-विरार मध्ये विवा होम्सच्या कार्यालयावर ईडीच्या धाडी
3 पालिकांची कोट्यवधींची पाणी थकबाकी
Just Now!
X