टीएमटीच्या अर्थसंकल्पात आधीच्याच घोषणांचा पुनरुच्चार

वातानुकूलित बसगाडय़ा, विजेवर तसेच बायोइथेनॉल इंधनावर चालणारी बससेवा, ई तिकीट योजना, महिलांसाठी तेजस्विनी बस, मोबाइल अ‍ॅप आणि आरक्षित भूखंडांवर आगारांचा विकास अशा जुन्याच घोषणांचा पुनरुच्चार करणारा ठाणे परिवहन उपक्रमाचा(टीएमटी) अर्थसंकल्प शुक्रवारी परिवहन समितीसमोर सादर करण्यात आला. डबघाईला आलेल्या ‘टीएमटी’च्या महसूल-खर्चातील तूट भरून काढण्यासाठी परिवहन प्रशासनाने महापालिकेकडे तब्बल १३६ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केल्याने यंदाचा अर्थसंकल्प ११६ कोटींनी वाढला आहे. मात्र, परिवहन प्रशासनाने यंदा आधीपासून केलेल्या घोषणा पूर्ण करण्यावरच यंदा भर दिल्याचे दिसून आले.

जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने गेल्या काही वर्षांपासून ठाणे परिवहन उपक्रम आर्थिक संकटात सापडला आहे. नादुरुस्त गाडय़ा, अपुऱ्या फेऱ्या अशा अनेक कारणांमुळे ठाणेकर प्रवाशांनी टीएमटीकडे पाठ फिरवली आहे.

या पाश्र्वभूमीवर आगामी आर्थिक वर्षांसाठी परिवहन उपक्रम अर्थसंकल्पात काय नवीन योजना आणणार, याकडे लक्ष लागले होते; परंतु परिवहन व्यवस्थापनाने आपला भर उपक्रमाचा आर्थिक गाडा रुळांवर आणण्यासाठी जुन्या ‘चाका’मध्ये नव्याने हवा भरण्याचा प्रयत्न केल्याचे शुक्रवारी दिसून आले. परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी २०१७-१८ या वर्षांकरिता एकूण २६८ कोटी २२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प परिवहन समितीसमोर सादर केला. गेल्या वर्षी परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प १५२ कोटी ९० लाख रुपये इतका होता. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल ११६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

येत्या वर्षांत नवीन ५० बसगाडय़ा

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात वोल्व्हो बससह एकूण ३५३ बसगाडय़ा आहेत. त्यामध्ये १२८ बसगाडय़ा सीएनजीवर, तर उर्वरित २२५ बसगाडय़ा डिझेलवर आहेत. येत्या वर्षांत ३५३ पैकी १८० ते १८५ बसगाडय़ा प्रत्यक्षात रस्त्यावर धावतील, असा दावा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. याशिवाय, ‘जेएनएनयबआरएम’ योजनेंतर्गत ५० बसगाडय़ा परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बसगाडय़ा कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येणार असून बसवरील वाहकांचा खर्चही अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे.

ठामपा व्हिजनयोजना

पुणे येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट या संस्थेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक लाख लोकसंख्येसाठी ३० बसगाडय़ा असणे गरजेचे आहे. ठाणे शहराची २३ लाख लोकसंख्या गृहीत धरता परिवहनच्या ताफ्यात ६९० बसगाडय़ा असणे आवश्यक आहे; परंतु परिवहनच्या ताफ्यात निम्म्याहून कमी बसगाडय़ा आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आखलेल्या ‘ठामपा व्हिजन’ योजनेअंतर्गत परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात  शंभर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाडय़ा जून २०१७ अखेपर्यंत, तर शंभर बायो इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या बसगाडय़ा डिसेंबर २०१७ पर्यंत दाखल होणार आहेत.

पालिकेसमोर हात

महसूल आणि भांडवली खर्चामध्ये परिवहनला १३६ कोटी १३ लाखांची तूट सोसावी लागणार असून त्यासाठी परिवहन उपक्रमाने ही रक्कम महापालिकेकडे अनुदान स्वरूपात मागितली आहे. याशिवाय, २०१७ ते २०२२ या पाच वर्षांमध्ये ‘ठामपा व्हिजन’ संकल्पनेतून परिवहनसाठी विविध योजना राबविण्यात येणार असून या योजनांकरिता येत्या वर्षांमध्ये ७० कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे परिवहनचा डोलारा सांभाळण्यासाठी पालिकेला २१२.४६ कोटींचा निधी पुरवावा लागणार आहे.

आगार विकासासाठी सल्लागार

ठाणे शहरात परिवहन उपक्रमाकरिता १९ भूखंड आरक्षित करण्यात आले असून येत्या पाच वर्षांत हे भूखंड विकसित करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. यापैकी काही भूखंड ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तसेच खासगी लोकसहभागातून विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये परिवहन उपक्रमाकरिता जागा राखून उर्वरित भूखंड भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे परिवहनला आर्थिक उत्पन्नाचा नवीन स्रोत मिळणार आहे. या भूखंडांचा विकास करण्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.