शहराबाहेरील मार्गावर सेवा सुरू करण्यात अपयश

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी शिथिल करत खासगी कंपन्यांमधील कामकाज सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला असला, तरी पुरेशा प्रवासी साधनांअभावी नोकरदार वर्गाचे गेले काही दिवस हाल सुरू आहेत. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना केवळ बस वाहतुकीचा आधार राहिला आहे. असे असले तरी ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने शहरातील बेस्ट बसच्या थांब्यांपर्यंतच बससेवा सुरू केली असून शहराबाहेरील सेवा सुरू करण्यात व्यवस्थापनाला यश मिळालेले नाही.

बोरिवली, मीरा रोड, नालासोपारा आणि भिवंडी या शहराबाहेरील मार्गावर अद्याप बससेवा सुरू केली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून या मार्गावरही बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. टप्प्याटप्प्याने बसगाडय़ांचे नियोजन सुरू असल्याने या मार्गावरही लवकरच बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

टाळेबंदीच्या काळात प्रवासी नसल्यामुळे टीएमटी प्रशासनाने सर्वच मार्गावरील बससेवा बंद केली होती. असे असले तरी गेल्या अडीच महिन्यांपासून शंभर बसगाडय़ा अत्यावश्यक सेवेतील आणि आस्थापनेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करीत आहेत. या बसगाडय़ा पालघर, शहापूर, बदलापूर आणि पनवेल या मार्गावरून कर्मचाऱ्यांनी वाहतूक करतात. तसेच शंभर बसगाडय़ांमध्ये बस रुग्णवाहिकांचाही समावेश आहे. दरम्यान, राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल करत खासगी कंपन्या दहा टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मुंबईतील कार्यालयांमध्ये जाण्यासाठी रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे नागरिकांना बसचा आधार घ्यावा लागत आहे. ठाणे स्थानक परिसर हा टीएमटीचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. रेल्वे बंद असल्यामुळे कोणत्या मार्गावर टीएमटी बस चालवायच्या असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. अखेर शहरातील तीन हात नाका तसेच इतर बेस्ट बसच्या थांब्यांपर्यंत अंतर्गत बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३५ बसगाडय़ांची शहरातंर्गत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी बोरिवली, मीरा रोड, नालासोपारा आणि भिवंडी या शहराबाहेरील मार्गावर अद्याप बससेवा सुरू नाही.

वातानुकूलित बस अशक्य

बोरिवली, मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी या मार्गावर दररोज प्रत्येकी दहा बसगाडय़ांमधून ४० फेऱ्या होतात, तर बोरिवली मार्गावर २५ वातानुकूलित बसगाडय़ांच्या १०० फेऱ्या होतात. या सर्वच मार्गावरून टीएमटीला दररोज पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळते. सध्या या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. तसेच या मार्गावर बससेवा सुरू झाली तरी त्या ठिकाणी वातानुकूलित बस चालविता येणार नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.