सुटय़ा पैशांवरून प्रवाशांशी हुज्जत घालणारा, तर कधी रांग मोडणाऱ्या प्रवाशांना बसमधून उतरवणारा ‘शिस्तप्रिय’ प्रतिमेमुळे टीकेचा धनी ठरणारा ‘टीएमटी’ वाहक प्रामाणिकही असतो, हे सिद्ध झाले आहे. टीएमटीच्या बोरिवली ते कोपरी या मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित बसमध्ये वाहक म्हणून काम करणारे दिलीप सुरेश देवकर (४९) यांना दुपारच्या सुमारास सोन्याचे दोन तोळे वजनाचे ब्रेसलेट सापडले. देवकर यांनी लागलीच ते वागळे इस्टेट येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वाहतूक विभागाकडे सोपविले आहे. देवकर यांनी वाहतूक विभागाच्या स्वाधीन केलेले ब्रेसलेट कुणाचे आहे याचा पत्ता अजूनही लागलेला नाही. संबंधित प्रवाशाने पुरावा घेऊन वागळे इस्टेट विभागातील टीएमटीच्या वाहतूक विभागाकडे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, देवकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे टीएमटी वाहकांची मलीन होत असलेली प्रतिमा सुधारण्यास मदत होईल, असा आशावाद प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने वेगवेगळ्या मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. कोपरी-बोरिवली मार्गावर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोरिवलीहून सुटणाऱ्या बसमध्ये प्रवासी चढत होते. या प्रवाशांना तिकीट देण्यासाठी गेलेल्या देवकर यांना बसमध्ये पडलेले सोन्याचे ब्रेसलेट महिला प्रवाशांनी निर्दशनास आणून दिले. देवकर यांनी ते ब्रेसलेट ताब्यात घेतले. त्यांना सुरुवातीला ते खोटे वाटले. मात्र ब्रेसलेटवरील होलमार्क पाहून ते खरे असल्याची देवकर यांना खात्री पटली. त्यांनी ताबडतोब ठाणे परिवहन उपक्रमाच्या वागळे आगारातील वरिष्ठ सहकाऱ्यांना ब्रेसलेट दाखवले आणि अर्ज भरून ते सोन्याचे ब्रेसलेट ‘वाहतूक विभागात’ सोपवले. हे ब्रेसलेट कुणाचे आहे याचा शोध अद्याप लागला नसला तरी संबंधित प्रवाशी पुरावा घेऊन आल्याने त्यांना ते लागलीच परत केले जाईल, अशी माहिती वाहतूक विभागातील सूत्रांनी दिले.