ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावे या टंचाईग्रस्त भागांना तातडीने बारवी धरणातून पाणीपुरवठा करण्यात यावा, असे निर्णय जलसंपदा विभागाने घेऊन आता एक आठवडा उलटला तरी त्याची अंमलबजावणी करण्याबाबत एमआयडीसी प्रशासनाने कमालीची उदासीनता दाखवली आहे. परिणामी या परिसराची पाणीटंचाईची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

ठाणे महापालिकेच्या वेशीवरील दिवा आणि कल्याण तालुक्यातील २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. लोकप्रतिनिधी, मंत्री आणि अधिकारी याबाबतीत आश्वासने देतात, पण प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल होत नाही.

यापूर्वीही दोन-तीन वेळा शिवसेना व भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पाण्याविषयी जलसंपदा विभागाशी बैठका घेतल्या आहेत. मात्र त्यात श्रेय घेण्यासाठीच चढाओढ दिसून येते. गेल्याच आठवडय़ात मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बारवी धरणातून दिवा शहराला प्रतिदिन १० दशलक्ष लिटर्स, तर २७ गावांना २५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. मात्र निर्णय होऊन आता एक आठवडा झाला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. एमआयडीसी अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता आम्ही याविषयी वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून आदेश आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगून ते जबाबदारी झटकत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला याविषयी विचारले असता ‘येत्या आठवडय़ात पाणी सुरू होईल.