प्रवासी हतबल; प्रशासनाकडून मात्र सुरक्षेची सबब

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांना बुधवारी आंदोलनकर्त्यांनी लक्ष्य केल्याने सकाळी ११च्या सुमारास व्यवस्थापनाने प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. बस चालक, वाहक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा बंद करत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी टीएमटीच्या बसगाडय़ांना विम्याचे कवच नसल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याची विश्वसनिय माहिती आहे.

भिमा-कोरेगावमधील घटनेच्या पाश्र्वभूमीवर रिपाइंने बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतरही टीएमटीच्या बसगाडय़ा पहाटेपासून रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत होत्या. ठाणे महापालिका क्षेत्रात आणि शहराबाहेरील मार्गावरही वाहतूक सुरळीतपणे होती. सकाळी सातनंतर मात्र भीमसैनिकांचे जथ्थे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडली. तसेच टीएमटीच्या बसगाडय़ांना लक्ष्य करत त्यांच्यावर दगड भिरकावले. यामध्ये पाच ते सहा बसच्या काचा फुटल्या. यात कुणीही जखमी झाले नाही.

आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे लक्षात येताच बस चालक, वाहक आणि प्रवासी या सर्वाच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने बससेवा बंद केली. बंदच्या भितीमुळे रिक्षा तसेच खासगी वाहने रस्त्यावर आली नव्हती. असे असताना सार्वजनिक वाहतुकीच्य दृष्टीने महत्वाची असणारी टीएमटीही बंद झाल्याने प्रवासी हतबल झाले. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला घरी परतावे लागले.

विम्याचे सुरक्षा कवच नसल्यामुळे बुधवारच्या आंदोलनात बसगाडय़ांचे नुकसान झाले तर त्याचा भरुदड टीएमटीच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळेच टीएमटीने बससेवाच बंद ठेवल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने १७ वर्षांपूर्वी राज्य शासनाची मंजुरी घेऊन स्वतंत्र विमा निधी तयार केला होता. टीएमटी बस अपघातातील दाव्यांच्या निकालानंतर याच निधीतून संबंधितांना भरपाईची दिली जाते. त्यामुळे टीएमटीच्या बसगाडय़ांचा विमा उतरविण्यात आलेला नाही. गेल्या काही वर्षांत अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने टीएमटीने आता विमा उतरविण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यास सर्वसाधारण सभेनेही नुकतीच मान्यता दिली आहे.

विम्याच्या सुरक्षाकवचाअभावी बससेवा बंद करण्यात आलेली नाही. दगडफेकीच्या घटनांमध्ये बस चालक, वाहक आणि प्रवाशांना इजा होऊ नये म्हणून बस बंद ठेवण्यात आल्या होत्या, असे टीएमटीचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी सांगितले.

टीएमटीला आर्थिक फटका

ठाणे महापालिका क्षेत्रात आणि शहराबाहेर टीएमटीच्या सुमारे २५० बसगाडय़ा धावतात. त्यातून दररोज २८ ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु आंदोलनामुळे बुधवार सकाळपासूनच बस बंद ठेवण्यात आल्याने टीएमटीला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. याशिवाय, बसगाडय़ांचा विमा काढण्यात आला नसल्यामुळे प्रशासनालाच काचांच्या दुरुस्तीचा भरुदड सहन करावा लागणार आहे.