ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर १०० बसेस सुरू करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता दिसू लागली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणारा कोटय़वधी रुपयांचा निधी उपयोगात आणून २०० पेक्षा अधिक बसेस विकत घेण्याचा प्रस्ताव टीएमटी उपक्रमाने आखला आहे. त्याचबरोबर आणखी १०० बसेस भाडेतत्त्वावर चालविण्याचे धोरण मध्यंतरी मंजूर करण्यात आले होते. मात्र, वारंवार निविदा काढूनही त्यास पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही योजना बारगळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
प्रवाशांची मोठी मागणी असतानाही ठाणे शहरात प्रभावी परिवहन सेवा पुरवणे टीएमटीला शक्य होत नाही. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून २२७ बस गाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय ठाणे परिवहन प्रशासनाने घेतला. या बसेस चालवण्यासाठी  वाहक आणि चालक कंत्राटी पद्धतीने नेमण्याचे ठरवण्यात आले. मात्र, प्रवाशांना आणखी सुविधा देण्यासाठी गर्दीच्या काही मार्गावर भाडेतत्त्वावर बस सुरू करण्याचे धोरण मध्यंतरी महापालिकेने आखले आहे. पालिका हद्दीबाहेर तब्बल २० ठिकाणी टीएमटीच्या बस धावतात. नवी मुंबई, कल्याण, बदलापूर या मार्गावर  प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे मार्ग नफ्यात चालवले जाऊ शकतात. घोडबंदर, मीरा-भाईंदर, वसई-विरार यांसारख्या मार्गावरही प्रवासी सेवेची मोठी मागणी आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या बस या मार्गावर सोडल्या जाव्यात, असा विचार टीएमटी प्रशासन करत आहे. सद्यस्थितीत टीएमटीकडून २५ बस भाडेतत्त्वावर चालवल्या जातात. पवारनगर, लोकमान्यनगर, शिवाईनगर यासारख्या परिसरात त्यापैकी काही धावतात.
दरम्यान, १०० बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी वर्षभर सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे टीएमटी प्रशासन चक्रावून गेले आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये या धोरणाला सर्वसाधारण सभेत हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू झाली. वेळोवेळी मुदतवाढ देऊनही त्यास प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती उपक्रमातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
सवलतींचा पाऊस
निविदांना प्रतिसाद मिळावा यासाठी उपक्रमाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार निविदा भरण्यासाठी सुरक्षा अनामत रकमेत तब्बल ४० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जो निविदाकार यशस्वी होईल त्याला बस उपलब्ध करून देण्यासाठी १२० दिवस व ३० दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला आहे. दंगल, अतिवृष्टी, बंद, संप या कालावधीत भाडेतत्त्वावरील बस चालवल्या नाहीत, तर ठेकेदाराला कोणत्याही स्वरूपाचा दंड आकारला जाणार नाही, अशी सवलतही आहे. रस्ता दुरुस्ती वा इतर कारणास्तव मार्ग बदल केल्यामुळे किलोमीटर वाढत असल्यास वाढीव किलोमीटरचे देयक कंत्राटदारास अदा केले जाईल. परिवहन उपक्रमासाठी नेमण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांनी दिली.  
टीएमटीचा पंचनामा
*‘टीएमटी’तर्फे महापालिका हद्दीमध्ये ६१ तर हद्दीबाहेर २० अशा ८१ मार्गावर सेवा पुरविण्यात येते.
* टीएमटीच्या ताफ्यात ३३३ बसेस आहेत.
* त्यापैकी बऱ्याचशा बसेस देखभाल, दुरुस्तीअभावी आगारात उभ्या असतात. पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नसल्याने आगारात उभ्या राहणाऱ्या बसेसची संख्याही बरीच मोठी आहे.
* परिवहन उपक्रमाच्या एका अहवालानुसार टीएमटीमधून दररोज सुमारे दोन लाख प्रवासी प्रवास करतात.