भाडेकपात केली तरी उत्पन्न घटणार; भाडे तितकेच ठेवले तर प्रवासी बेस्टकडे वळण्याची भीतीखास

मुंबईतील बेस्ट उपक्रमाप्रमाणेच ‘टीएमटी’च्या बसगाडय़ांचेही भाडे कमी करण्याची मागणी जोर धरू लागल्याने ठाणे परिवहन प्रशासनाने भाडेकपातीबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यामध्ये बेस्ट बसप्रमाणेच तिकीट दर लागू केले तर टीएमटीला वर्षांकाठी २५ ते ३० कोटींचा तोटा सहन करावा लागू शकतो आणि भाडेकपात केली नाहीतर टीएमटीचे प्रवासी बेस्टच्या स्वस्त प्रवासाकडे वळून उत्पन्नवर परिणाम होऊ शकतो, अशी बाब समोर आली आहे. त्यामुळे ठाणे परिवहन प्रशासनापुढे दुहेरी पेच निर्माण झाला आहे.

मुंबईतील बेस्ट उपक्रमाने बसगाडय़ांच्या तिकीटदरात कपात केली असून नवे दर गेल्या मंगळवारपासून लागू झाले आहेत. बेस्टच्या स्वस्त प्रवासाला मुंबईकरांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ा ठाणे शहरातील विविध मार्गावर चालवण्यात येत असून या मार्गावरील टीएमटीचे प्रवासी स्वस्त प्रवासामुळे बेस्टकडे वळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाप्रमाणेच टीएमटीच्या बसगाडय़ांचेही भाडे कमी करण्याची मागणी पुढे आली होती. यासंदर्भात ठाणे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक यांनी परिवहन प्रशासनाला पत्र दिले होते. ही मागणी जोर धरू लागल्याने परिवहन प्रशासनाने भाडेकपातीबाबत चाचपणी सुरू केली असून त्यामध्ये तिकीट कमी केले तरी आणि नाही कमी केले तरी तोटा सहन करावा लागण्याची शक्यता समोर आली आहे.

टीएमटीला वर्षांकाठी ८० ते ८५ कोटींचा तोटा सहन करावा लागत असून त्यात भाडेकपात केल्यास आणखी २५ ते ३० कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात ठाणे परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, बेस्टप्रमाणे टीएमटीचे भाडे कपात करण्यासंबंधी सविस्तर अभ्यास सुरू असून त्यासंबंधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तिकीट दर असे आहेत

बेस्ट उपक्रमाने साध्या आणि वातानुकूलित बसगाडय़ांचे नवे दर लागू केले असून त्यानुसार साध्या बसगाडय़ांसाठी पाच किमी अंतरापर्यंतचे भाडे पाच रुपये तर १५ किमी अंतरापर्यंतचे २० रुपये, असे तिकीट दर आहेत. तर टीएमटीच्या साध्या बसगाडय़ांचे दोन किमी अंतरासाठी ७ रुपये, चार किमी अंतरासाठी १० रुपये, सहा किमी अंतरासाठी १३ रुपये, १६ किमी अंतरासाठी २२ रुपये आणि ४० किमी अंतरासाठी ३६ रुपये असे तिकीट दर आहेत. ठाणे शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या सुमारे दोनशे बसगाडय़ा चालवण्यात येत असून त्याद्वारे बेस्टला दररोज २० लाखांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘बेस्ट’चा फटका

ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा ठाणे-बोरिवली या मार्गावर चालवण्यात येतात. या मार्गावरून टीएमटीला सर्वाधिक म्हणजेच दररोज पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळते. या मार्गावर बेस्ट उपक्रमासह नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा चालवण्यात येतात. या मार्गावर बेस्टचे भाडे २० रुपये तर टीएमटीचे तिकीट ३० रुपये इतके आहे. त्याचप्रमाणेच अंधेरी आणि मुंबईतील मार्गावरही बसगाडय़ांचे तिकीट दर काहीसे असेच आहेत. यामुळे टीएमटीच्या तुलनेत बेस्टचे तिकीट दर खूपच कमी असल्यामुळे टीएमटीचे प्रवासी बेस्टकडे वळण्याची भीती व्यक्त होत आहेत.

उत्पन्नावरही परिणाम?

ठाणे-बोरिवली या मार्गावर टीएमटीच्या वातानुकूलित बसचे भाडे ८५ रुपये तर बेस्टच्या वातानुकूलित बसचे तिकीट दर २५ रुपये असणार आहे. या मार्गावरील वातानुकूलित बस सेवा वर्षभरापूर्वी बेस्टने बंद केली. असे असले तरी येत्या काही महिन्यांत बेस्टच्या ताफ्यात वातानुकूलित बस दाखल होणार असून त्यापैकी काही बस ठाणे-बोरिवली मार्गावर चालवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच या मार्गावर राज्य परिवहन सेवेच्या वातानुकूलित शिवशाही बसचे भाडे ४८ रुपये तर नवी मुंबई परिवहन बसचे भाडे ९५ आहे. त्यामुळे या तिन्ही उपक्रमांच्या उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.