नीलेश पानमंद

वाहतूक कोंडीमुळे परिवहनच्या दैनंदिन उत्पन्नात दोन ते अडीच लाखांची घट

घोडबंदर मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे होणाऱ्या कोंडीचा फटका नागरिकांप्रमाणेच ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेलाही बसू लागला आहे. कोंडीमुळे दिवसाला घोडबंदर मार्गावरील किमान ३० फेऱ्या रद्द होऊ लागल्या आहेत. सायंकाळी गर्दीच्या वेळेत फेऱ्या रद्द होत असल्यामुळे टीएमटीला आर्थिक नुकसान आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबई, ठाणे तसेच घोडबंदर या भागातील सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गावर मार्गरोधक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठीचा रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. सेवा रस्त्यांवरही जल आणि मलवाहिन्यांची कामे सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याशिवाय, घोडबंदर भागातील अंतर्गत वाहतुकीसाठी असलेल्या पर्यायी मार्गावरही खोदकामे सुरू आहेत. घोडबंदर मार्गावरून दुपारी अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे आता दुपारच्या वेळेतही कोंडी होते. कोंडीमुळे नागरिक  हैराण झाले असतानाच आता त्यांना टीएमटीच्या पुरेशा बसगाडय़ाही उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या मनस्तापात भर पडली आहे.

६५ टक्के गाडय़ा घोडबंदरवर

टीएमटीला रोज २७ ते २८ लाखांचे उत्पन्न मिळते. घोडबंदर मार्गावर टीएमटीच्या ६५ टक्के बसगाडय़ा चालविण्यात येतात. या मार्गावरून दररोज १७ ते १८ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे सर्वाधिक उत्पन्नाचा म्हणून हा मार्ग ओळखला जातो. परंतु वाहतूक कोंडीमुळे आता येथील उत्पन्नामध्ये दररोज दोन ते अडीच लाख रुपयांनी घट होऊ लागली आहे. या संदर्भात परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बैठक घेऊन उपाययोजना सुचविल्या आहेत. कोंडी सुटल्यानंतर टीएमटीचे उत्पन्न पुन्हा वाढले, असे त्यांनी स्पष्ट केले.