पालिकेचा औषध कंपनीशी करार

वसई : कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असलेल्या गंभीर आजारी करोनाबाधित रुग्णांना लागणारे टॉसिलिझमॅब हे महागडे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने पालिकेने थेट औषध कंपनीबरोबर करार करून त्यांच्याकडून साठा मागवला आहे. एका इंजेक्शनची किंमत ४५ हजार रुपये असल्याने पालिकेने खाजगी रुग्णालयांकडून  इंजेक्शन घेऊन रुग्णांना देण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने आतापर्यंत १३ रुग्णांना हे इंजेक्शन देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत.

करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असलेला आणि  तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा समावेश होतो. गंभीर आजारी असलेले रुग्ण तिसऱ्या टप्प्यात गेल्यास त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटरवर) ठेवावे लागते तसेच त्यांना टॉसिलिझमॅब हे इंजेक्शन द्यावे लागते.

या इंजेक्शनची किंमत ही ४५ हजार रुपये एवढी आहे. मात्र हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. हे इंजेक्शन मिळत नसल्याने पालिकेने रिद्धिविनायक या खाजगी रुग्णालयातूनच १३ इंजेक्शन घेऊन ती रुग्णांना दिली आहेत. यामुळे १३ रुग्णांचे प्राण वाचले आहेत. ही इंजेक्शने अत्यंत महत्त्वाची तसेच महागडी आहेत. मात्र ती  कुठेच मिळत नाही.

यासाठी आम्ही रुग्णालयाला विनंती करून त्यांच्याकडून ही इंजेक्शन घेऊन रुग्णांना दिली आहेत. आमच्याकडे इंजेक्शने आली की रुग्णालयाला ती परत केली जातील, असे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तब्बसुम काझी यांनी सांगितले.  पालिकेने यासाठी सिपला कंपनीबरोबर करार केला असून त्यांच्याकडून घाऊक स्वरूपात साठा मागवला आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळाला असून इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांना चाप बसणार आहे.

ही इंजेक्शने कुठेच मिळत नसून ती सर्वसामान्य रुग्णांना परवडणारीदेखील नाहीत. त्यासाठी आम्ही थेट औषध कंपन्यांकडून मागवली आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांना आम्ही ही इंजेक्शने विनामूल्य दिली आहेत.

– डॉ तब्बसुम काझी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई विरार महापालिका