केशवसुत, पु. शि. रेगे यांच्या कवितांवरील संहितेचे वाचन

‘हरीतात्या’पासून ते ‘अंतू बव्र्या’सारखी अजरामर पात्रे ज्यांनी लेखनाच्या माध्यमातून वाचकांपुढे उभी केली, अशा पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या मात्र आजवर अप्रकाशित राहिलेल्या साहित्याचा ठेवा ‘लोकसत्ता’ने ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकातून प्रकाशित केला आहे. या विशेषांकाच्या निमित्ताने ‘पुलं’च्या साहित्यकृतीच्या अभिवाचनाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात टिपटॉप प्लाझा येथे पार पडणार आहे. कविवर्य केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांवर ‘पुलं’नी लिहिलेल्या संहितेचे अभिनेते सचिन खेडेकर वाचन करणार आहेत.

साहित्यात मार्मिक विनोदासोबत सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातील घडामोडींचे तितक्याच लोभसपणे लेखण करणारे लेखक अशी पुलंची ओळख प्रत्येक वाचकाला आहे. आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक वाचकाने एकादा तरी पुलंचे पुस्तक वाचलेले असते.  ‘लोकसत्ता’ने पुलंचा वाचकवर्ग लक्षात घेऊन पुलं रसिकांना, वाचनात न आलेल्या पुलंच्या दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेता यावा याकरिता ‘अप्रकाशित पुलं’ हा विशेषांक प्रकाशित केला आहे. हा अंक महाराष्ट्रात सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या विशेषांकाच्या निमित्ताने आज ठाण्यात टिपटॉप प्लाझा येथे अभिनेते सचिन खेडेकर हे पुलंच्या साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. यात कविवर्य केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांवर पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या संहितेचा समावेश असणार आहे. पुलंनी लिहिलेल्या साहित्यकृती या पुलंच्या काळातील घटनांना अनुसरून असल्या तरी त्याची प्रचीती आजच्या काळातही अनेकांना येत असते. पुलंच्या साहित्याचे वाचन करताना जितके रममाण व्हायला होते तितकेच रममाण त्यांनी लिहिलेली साहित्यकृती ऐकतानाही होते. पुलंच्या अशाच दर्जेदार अप्रकाशित संहितेचे वाचन ऐकणे ही मोठी पर्वणीच असणार आहे. आज होणाऱ्या या अभिवाचन कार्यक्रमात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रायोजक

या कार्यक्रमाचे सहप्रायोजक व्हीटीपी रिअ‍ॅलिटी, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., पितांबरी आणि पॉवर्ड बाय मँगो हॉलिडेज आणि पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स आहेत.

कुठे?

हॉटेल टीपटॉप प्लाझा, एलबीएस मार्ग, चेकनाक्याजवळ, रहेजा गार्डनसमोर, ठाणे-पश्चिम

कधी?

शुक्रवार, ७ डिसेंबर सायंकाळी ६ वाजता